कृषी महोत्सवाकडे शेतकरी फिरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:52 PM2018-02-19T22:52:52+5:302018-02-19T22:53:14+5:30

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहचावे, कृषी विषयक घडमोडींची माहिती त्यांना मिळावी. यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात नेमके याविरुद्ध चित्र आहे.

Farmer Punchana to the Agri Mahotsava | कृषी महोत्सवाकडे शेतकरी फिरकेना

कृषी महोत्सवाकडे शेतकरी फिरकेना

Next
ठळक मुद्देस्टॉल धारकांची गैरसोय : ४० वर स्टॉल रिकामेच

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहचावे, कृषी विषयक घडमोडींची माहिती त्यांना मिळावी. यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात नेमके याविरुद्ध चित्र आहे. कृषी महोत्सवाची माहिती बांधापर्यंत तर सोडा शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीच नसल्याने या महोत्सवाकडे शेतकरीच फिरकत नसल्याचे चित्र सोमवारी (दि.१९) तिसऱ्या दिवशी देखील कायम होते.
कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय जिल्हा कृषी व पलास महोत्सवाचे आयोजन मरारटोली परिसरातील क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. महोत्सवस्थळी शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. यासाठी कृषी अवजारे, कीटकनाशके यांच्यासह बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे स्टॉल लावण्यात आले आहे. आयोजकांनी याठिकाणी २०० स्टॉलची व्यवस्था केली. मात्र यापैकी ४० वर स्टॉल रिकामे आहेत. तर उर्वरित स्टॉलवर खाद्य साहित्य आणि सौंदर्य प्रसाधाने विक्रीचे स्टॉल आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात अनेक प्रगतीशिल शेतकरी असताना या महोत्सवात केवळ दोन तीन प्रगतीशिल शेतकºयांचे स्टॉल आढळले. कृषी महोत्सवाच्या नावाप्रमाणे या महोत्सवात कृषी विषयक माहितीचाच अभाव दिसून येत होता. त्यामुळेच या महोत्सवाकडे शेतकरी भटकत नसल्याचे चित्र आहे. तर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची किंवा एखाद्या शेतकºयांने शेतीत केलेल्या यशस्वी प्रयोगाची माहिती महोत्सवातील एकाही स्टॉलवर शोधून सापडली नाही. त्यामुळे ज्या मोजक्या शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली त्यांचा देखील हिरमोढ झाला. विशेष म्हणजे या महोत्सवात जि.प.पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांची माहिती देण्यासाठी एक मंडप उभारण्यात आले आहे. यात केवळ तीन गायी असून बाकी मंडप रिकामे होते. एकंदरीत जेवढा खर्च आयोजकांनी महोत्सवाच्या आयोजनासाठी केली तेवढीच मेहनत महोत्सवापर्यंत शेतकरी कसे पोहचतील यासाठी न केल्याने हे कृषी महोत्सव एक प्रकारे फसल्याचे चित्र होते.
दीडशे रुपये घ्या अन् मोकळे व्हा
कृषी महोत्सवात स्टॉल लावलेल्या स्टॉल धारकांना जेवणासाठी आयोजकांकडून दीडशे रुपये दिले जात आहे. मात्र महोत्सव स्थळापासून खाणावळ दोन कि.मी.अंतरावर असल्याने स्टॉल धारकांसाठी गैरसोयीचे होते. एकंदरीत कृषी विभागाने दीडशे रुपये घ्या आणि तुमची व्यवस्था तुम्हीच करा असा सल्लाच अप्रत्यक्षपणे स्टॉलधारकांना दिला. एका स्टॉल धारक महिलेने जेवणासाठी गैरसोय होत असल्याचे सांगितले.
जनजागृतीला मर्यादेची सीमा
कृषी विभागातर्फे कृषी महोत्सवाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी यासाठी कृषी रथ तसेच कृषी विभागाचे वाहने फिरविण्यात आली. मात्र यासाठी वाहनचालकांना नेमक्या अंतरापर्यंतच जाण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले. त्यामुळे अनेक गावापर्यंत कृषी महोत्सवाची माहिती पोहचणारे रथच पोहचले नसल्याची माहिती आहे. कृषी विभागाने जनजागृतीला मर्यादा लावल्याने त्याचा फटका महोत्सवाला बसला. मात्र यात नुकसान बचत गटांच्या महिलांचे झाले.
महोत्सवाला भेट देणारे सगळेच शेतकरी
कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फसलेल्या कृषी महोत्सवाचे खापर आपल्यावर फुटू नये. कृषी महोत्सवाला कशी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट दिली. हे दाखविण्यासाठी केवळ फेरफटका म्हणून कृषी महोत्सवाला भेट देणाऱ्याची गणणा सुध्दा शेतकरी म्हणून केली जात आहे. महोत्सवस्थळी महिला आणि पुरुषांची स्वतंत्र नोंदणी केली जाते. महोत्सवाला भेट देणाऱ्यामध्ये शहरातील नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांचा आकडा फुगवून दाखविण्यासाठी त्यांची नोंद देखील शेतकरीच म्हणून करीत आहे.

Web Title: Farmer Punchana to the Agri Mahotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.