शेतकऱ्यांनो जनावरांना लम्पीचा पुन्हा धोका; लक्षणे आढळल्यास घ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:07 IST2024-12-24T16:05:54+5:302024-12-24T16:07:47+5:30

यंत्रणा अलर्ट: जिल्ह्यात २.९२ लाख जनावरांचे लसीकरण

Farmers, animals at risk of lumpy disease again; seek advice from veterinary officials if symptoms occur | शेतकऱ्यांनो जनावरांना लम्पीचा पुन्हा धोका; लक्षणे आढळल्यास घ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला

Farmers, animals at risk of lumpy disease again; seek advice from veterinary officials if symptoms occur

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
लम्पी हा अतिशय भयंकर आजार आहे. या आजारामुळे जनावरांची तब्येत बिघडते. तसेच या आजाराची लागण इतर जनावरांनाही होत असल्याने इतरही जनावरे या आजाराचे शिकार होतात. या आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी पशुवैद्यकीय यंत्रण अलर्ट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने मागील महिन्यात सुमारे दोन लाख ९२ हजार जनावरांना लम्पी आजाराची प्रतिबंधात्मक लस दिली आहे.


लम्पी या रोगाचा संसर्ग कॅप्रीपॉक्स विषाणूमुळे होतो. हा विषाणू शेळ्ळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे. लम्पी त्वचारोग हा केवळ गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग डास, चावणाऱ्या माशा, गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारापाणी यामुळे पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. लम्पी त्वचारोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करणे गरजेचे. 


तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करून घेतल्यास हा रोग बरा होतो. त्वचेवरील गाठीचे जखमेत रूपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये, यासाठी जखमेवर औषध मलम लावावे. लम्पी आजाराची लक्षणे आढळून आल्यास पशुपालकांनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. 


हे आहेत उपाय 
बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे, कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे, रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे. डास, गोचिड, तत्सम किड्यांचा बंदोबस्त करणे, तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावावे.


ही आहेत लम्पीची लक्षणे...
जनावराच्या अंगावर १० ते २० मिमी. व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस भरपूर ताप, डोळ्यातून नाकातून चिकटस्राव, चारा-पाणी खाणे कमी अथवा बंद, दूध उत्पादन कमी, काही जनावरांच्या पायावर सूज येणे व लंगडणे आदी लक्षणे दिसून येतात.


जिल्ह्यात गायवर्ग जनावरे - २.९२ लाख 
जिल्ह्यात एकूण पशुवैद्यकीय दवाखाने - १०३ 
जि.प.चे पशुवैद्यकीय दवाखाने - ७२ 
स्टेटचे पशुवैद्यकीय दवाखाने - ३१ 
लस पशुसंवर्धन विभागाने केलेले लसीकरण - १,८९,३५८ 


"लम्पी आजारासाठी विशेष असे औषध नाही. तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस दिली जाते. ही प्रतिबंधात्मक लस अतिशय परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत गायवर्गीय जनावरांना मोफत लस टोचण्यात आली आहे. लम्पी आजाराची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा." 
- डॉ. कांतीलाल पटले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

 

Web Title: Farmers, animals at risk of lumpy disease again; seek advice from veterinary officials if symptoms occur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.