सरकार करतेय शेतकऱ्यांना ‘एप्रिल फूल’- प्रफुल्ल पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2017 01:09 AM2017-04-02T01:09:36+5:302017-04-02T01:09:36+5:30

शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जास्त भाव देण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्तारूढ सरकारचे नेते सत्तेवर येताच

Farmers 'April fools' - Praful Patel | सरकार करतेय शेतकऱ्यांना ‘एप्रिल फूल’- प्रफुल्ल पटेल

सरकार करतेय शेतकऱ्यांना ‘एप्रिल फूल’- प्रफुल्ल पटेल

Next

राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर : १५ एप्रिलनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन
गोंदिया : शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जास्त भाव देण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्तारूढ सरकारचे नेते सत्तेवर येताच आपले आश्वासन विसरले आहे. शेतमालाला योग्य भाव देणे तर दूर, उलट २०१४ च्या तुलनेत २०१७ मधील शेतमालाचे भाव कमी आहेत. यामुळे समस्त शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ना योग्य भाव, ना कर्जमाफी, यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना ‘एप्रिल फूल’ करीत आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता, माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी गोंदियात पत्रकारांशी बोलताना केली.
नोटाबंदीला आम्ही विरोध केला नाही, पण नोटाबंदीनंतर आज ठिकठिकाणच्या जिल्हा सहकारी बँकांमध्ये पडून असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्याचे निर्देश सरकारने दिलेले नाही. हा शेतकऱ्यांचा पैसा आहे. तो पैसा आणि त्यावरील व्याज बुडाल्यास शेतकऱ्यांना फटका बसेल. जिल्हा सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशानुसारच काम करतात, तरीही सरकार हा भेदभाव का करीत आहे? असा सवाल खा.पटेल यांनी केला. गोंदिया आणि भंडारा जिल्हा सहकारी बँकांवर निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सरकारने प्रशासक नेमून सर्व व्यवहारांची चौकशी आपल्या यंत्रणेमार्फत केली, पण काहीच हाती लागले नाही. अखेर न्यायालयाने दणका देत प्रशासक बसविण्याचा निर्णय मागे घेण्याचा आदेश दिला. सरकारने किमान शेतकऱ्यांचे हितसंबंध येतात तिथे तरी राजकारण करू नये, अशी अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली. यावेळी नरेश माहेश्वरी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

आधीचे मंजूर प्रकल्पही ठप्प
गेल्या अडीच वर्षात सरकारने विकासाच्या नावावर कोणत्याही नवीन गोष्टी केलेल्या नाहीत. शेतकऱ्यांसह बेरोजगारांचे प्रश्न काही अंशीही सोडविले नाहीत. एवढेच नाही तर आधीच्या सरकारच्या कार्यकाळात मंजूर केलेले प्रकल्पही सत्तारूढ सरकारमधील नेते मार्गी लावू शकले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विविध प्रश्नांवर येत्या १५ एप्रिलनंतर रस्त्यावरून उतरून ठिकठिकाणी आंदोलन सुरू करणार आहे, अशी माहिती खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

 

Web Title: Farmers 'April fools' - Praful Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.