ऊस लागवडीतून शेतकरी होत आहेत सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:20 AM2018-08-15T01:20:02+5:302018-08-15T01:20:38+5:30

धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख गोंदिया जिल्ह्याची आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा दरवर्षी शेतीला बसत असलेल्या फटक्यामुळे शेतकरी सुध्दा धानाला पर्याय शोधत आहे.

Farmers are being able to cultivate sugarcane | ऊस लागवडीतून शेतकरी होत आहेत सक्षम

ऊस लागवडीतून शेतकरी होत आहेत सक्षम

Next
ठळक मुद्देतीन एकरातून १२ लाखांचे उत्पन्न : आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख गोंदिया जिल्ह्याची आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा दरवर्षी शेतीला बसत असलेल्या फटक्यामुळे शेतकरी सुध्दा धानाला पर्याय शोधत आहे. गोरेगाव तालुक्यातील कंटगी येथील एका शेतकऱ्यांने पांरपरिक धान शेतीला फाटा देत तीन एकरवर उसाची लागवड करुन त्यातून १२ लाखांचे उत्पन्न घेवून शेतकºयांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
फनेंद्र हरिणखेडे असे त्या शेतकºयाचे नाव आहे. स्वत: उच्च शिक्षित असून त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग आधुनिक शेतीसाठी करुन घेतला. हरिणखेडे यांच्याकडे एकूण १४ एकर शेती आहे. यापैकी ३ एकर शेतीत त्यांनी मागील वर्षी उसाची लागवड केली.पहिल्या वर्षी यातून त्यांनी १२ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. सुरूवातीला त्यांनी प्रयोग म्हणून तीन एकरवर उसाची लागवड केली. त्याचे सुक्ष्म नियोजन करुन आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. जंगली प्राण्यांकडून होणारे पिकांची नासधूस टाळण्यासाठी व चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी त्यांनी शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. कमी क्षेत्रात अधिक उसाचे उत्पादन कसे घेता येईल, यासाठी त्यांनी काही प्रयोगशिल ऊस उत्पादक शेतकºयांच्या शेतीला भेट दिली. त्यांच्याकडून उसाच्या लागवडीची बारीक सारीक माहिती जाणून घेतली. त्यानंतर याच माहितीच्या आधारावर त्यांनी उसाची लागवड केली. यातून त्यांना पहिल्याच वर्षी १२ लाखांचे उत्पन्न मिळाले. शिवाय धानाच्या शेतीपेक्षा उसाचा लागवड खर्च देखील कमी असल्याने त्यांच्या पैशाची बचत झाली. हरिणखेडे हे गोरेगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत. नोकरी करुन सुटीच्या दिवशी व फावल्या वेळात ते पूर्ण वेळ शेतावर घालवितात.
त्यांच्या शेतात रुद्राक्ष, शम्मी, लाल जाम, अंजीर, हापुस आंबा, सागवान, निंबू, चिंच अशी विविध प्रकारची झाडे लावली आहेत. मागील वर्षी त्यांना चांगले उत्पन्न मिळाल्याने यंदा त्यांनी चार एकरवर दोन प्रजातीच्या उसाची लागवड केली आहे. उसाचा प्रती एकर लागवड खर्च ३० हजार रूपये असून यातून जवळपास २०० टन उसाचे उत्पादन होते. मागील वर्षी ऊस लागवडीतून १२ लाखांचा नफा मिळाल्याचे हरिणखेडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

जोपर्यंत शेतकरी पांरपरिक पिकांना फाटा देत दुसºया पिकांची लागवड करणार नाही, तोपर्यंत शेतीतून अधिक उत्पन्न घेणे शक्य होणार नाही. शेतकऱ्यांनी उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाची शेतीला जोड दिल्यास निश्चित शेती करणे फायद्याचे ठरेल.
- फनिंद्र हरिणखेडे, शेतकरी

शुद्ध पाण्याचा पुरवठा
हरिणखेडे यांनी शेतीला संरक्षीत सिंचनाची सोय व्हावी, यासाठी शेततळे तयार केले आहे. शेततळ्यातील पाणी पिकांना देण्यापूर्वी पाण्याचे शुध्दीकरण करण्यासाठी पाणी शुध्दीकरण यंत्र लावले आहे. यामुळे पिकांना किडरोगांची लागण होत नाही.
पंधरा लोकांना रोजगार
हरिणखेडे यांच्याकडे एकूण १४ एकर शेती आहे. यापैकी ३ एकरवर त्यांनी उसाची लागवड केली आहे. ही शेती करण्यासाठी त्यांनी एकूण पंधरा मजूर वर्षभरासाठी ठेवले आहेत. त्यामुळे मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देणे सुध्दा शक्य झाले आहे.
पाच सीसीटीव्ही कॅमेरे
शेतातील शेतमाल व औजारे चोरीला जावू नये, जंगली प्राण्यापासून होणारे पिकांचे नुकसान टाळता यावे. यासाठी शेतातील मुख्य भागात पाच सीसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत. यापूर्वी त्यांच्या शेतातून मोटारपंप व कृषी अवजरांची चोरी झाली होती. मात्र सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे या प्रकाराला सुध्दा आळा बसला.

Web Title: Farmers are being able to cultivate sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी