मक्याच्या शेतीतून शेतकरी होतोय सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:06 PM2019-03-27T22:06:14+5:302019-03-27T22:06:35+5:30
येथील प्रगतीशील शेतकरी उमेदलाल जैतवार यांनी केवळ तीन महिन्याच्या कालावधीतच दोन हेक्टरमध्ये मक्याची लागवड करुन त्यातून तीन लाख रुपयांचे उत्पादन घेवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : येथील प्रगतीशील शेतकरी उमेदलाल जैतवार यांनी केवळ तीन महिन्याच्या कालावधीतच दोन हेक्टरमध्ये मक्याची लागवड करुन त्यातून तीन लाख रुपयांचे उत्पादन घेवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
उमेदलाल जैतवार यांच्याकडे जुना सालेकसा परिसरात एकूण आठ एकर शेती आहे. त्यांनी या ठिकाणी फार्म हाऊस तयार केला आहे. कृषी कौशल्याच्या उपयोग करीत दर वर्षी एकाच जमिनीवर वर्षातून तीनदा वेगवेगळे पीक घेण्याचा प्रयोग ते करीत आहे. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना बगल देत मका, काकडी, तूर, कारल्या, वाल, चवळी आदी पिकांची लागवड केली. मागील तीन वर्षापासून डिसेंबर जानेवारी ते मार्च दरम्यान मका, एप्रिल मे दरम्यान काकडी आणि जून ते सप्टेंबर, आॅक्टोबर दरम्यान वाल, कारल्या, तूर या पिकांच्या लागवडीचा प्रयोग राबवित आहे. यामध्ये प्रत्येक हंगामात लाखाचे उत्पन्न प्राप्त करुन वर्षाअखेर ९ ते १० लाखाचे उत्पादन घेत असून यातून त्यांना पाच ते सहा लाख रुपयांचा शुध्द नफा सुध्दा मिळत आहे. यामुळे गावातील २० ते २५ महिला पुरुष मजुरांना वर्षभर रोजगार सुध्दा मिळत आहे. जैतवार यांनी दोन हेक्टर जमिनीवर मक्याचे उत्पादन घेऊन प्रती एकर सरासरी ३५ क्विंटल मक्याचे उत्पादन घेतले. त्याची एकूण किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे. मक्याच्या कडबा सुध्दा विक्री करीत आहेत.
पाणी व खताची बचत
मक्याच्या शेतीला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जमिनीत ओलावा ठेवण्यासाठी फक्त तीन ते चार वेळा थोडसेच पाणी द्यावे लागते. त्यामुळे पाण्याची व विजेची सुध्दा बचत होते. तसेच मक्याच्या शेतीला एक किंवा दोन वेळा थोड्या प्रमाणात युरियाची मात्रा द्यावी लागते. रोगांचा किंवा किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे खतासह कीटकनाशक औषधीचा सुध्दा खर्च येत नाही. त्यामुळे मक्याची शेती जास्त फायदेशीर ठरत आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत
मागील दोन तीन वर्षांपासून धान उत्पादक शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. तर लागवड खर्च वाढला असल्याने धानाची शेती तोट्याची होत चालली आहे. त्यामुळे अशात कमी खर्चाची आणि कमी कालावधीत येणाऱ्या मक्याची शेती फायदेशीर ठरु शकते.
महाराष्ट्र दर्शनातून मिळाली प्रेरणा
कमी खर्चातून अधिक उत्पादन घेण्याची शेती कशी करायची याची प्रेरणा त्यांना महाराष्ट्र दर्शनाच्या माध्यमातून मिळाली. जैतवार यांना आधीपासूनच कृषी कार्य करण्याची आवड असल्याने शेती विषयक पत्रिका वाचनाची सवय लागली. यातून त्यांना पिकांबद्दल माहिती मिळत गेली. २००७ मध्ये कृषी विभागामार्फत कृषी विषयक अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला. या दरम्यान महाराष्ट्र दर्शन करीत विविध पिकांची प्रत्यक्ष पाहणी व प्रात्यक्षिके पाहणी करण्यास मिळाले. याचीच त्यांना मदत झाली.