सन्मान निधीच्या लाभासाठी शेतकरी वेटींगवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:30+5:30
गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ५४ हजार खातेदार शेतकरी आहेत. यापैकी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी २ लाख ४४ हजार २०२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी पडताळणीनंतर २ लाख २६ हजार ४०० शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन तीन महिन्यांनी जमा केले जातात. आत्तापर्यंत केंद्र सरकारने या योजनेचे पाच हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारने गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी योजनेतंर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये पेशंन देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या योजनेची देशभरात अंमलबजावणी करण्यात आलीे. यासाठी जिल्ह्यातील २ लाख ४४ हजार २०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. यापैकी २ लाख २६ हजार ४०० शेतकरी पात्र ठरले. मात्र पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण हप्त्यांचा लाभ अद्यापही मिळालाच नसल्याची धक्कादायक बाब उघकीस आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ५४ हजार खातेदार शेतकरी आहेत. यापैकी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी २ लाख ४४ हजार २०२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी पडताळणीनंतर २ लाख २६ हजार ४०० शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन तीन महिन्यांनी जमा केले जातात. आत्तापर्यंत केंद्र सरकारने या योजनेचे पाच हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. यात पहिल्या हप्ता एकूण १ लाख ३४ हजार ९० शेतकऱ्यांच्या खात्यावर, दुसऱ्या हप्ता १ लाख ९० हजार १२ शेतकºयांना, तिसऱ्या हप्ता १ लाख ५६ हजार ३९ शेतकरी, चौथ्या हप्ता १ लाख १० हजार १६३ शेतकऱ्यांना आणि पाचव्या हप्ता ७७ हजार ५७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आत्तापर्यंत जमा करण्यात आला आहे. पाच हप्ते जमा करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता जिल्ह्यातील जेवढे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी आत्तापर्यंत कधीच संपूर्ण पात्र शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सरासरी ४० हजारावर पात्र शेतकरी अजुनही या योजनेच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट केंद्र सरकारकडून रक्कम जमा केली जात असल्याने याची माहिती स्थानिक जिल्हा प्रशासनाला सुध्दा नसते. रक्कम जमा झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला या ऑनलाईन रक्कम जमा करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येची यादी उपलब्ध करुन देत असल्याची माहिती आहे. ज्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली तो उद्देश मात्र या योजनेचा लाभ संपूर्ण शेतकऱ्यांना मिळत नसल्याने साध्य होत नसल्याचे चित्र आहे.
हप्ते जमा झाले नसल्याची ओरड कायम
पंतप्रधान सन्मान निधी योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या शेतकºयांना ही योजना सुरू झाल्यापासूनच या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांच्या बँक खात्यावर अद्यापही पहिल्या हप्त्याची रक्कम झाली नसल्याने त्यांची यासाठी प्रतीक्षा कायम आहे. तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसरा आणि तिसरा हप्ता जमा झाला नसल्याची तक्रार आहे. एकंदरीत सुरूवातीपासून या योजनेचा लाभ पूर्ण पात्र शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची बाब याद्यांवरुन स्पष्ट होते.
पात्र आहे तर हप्ते जमा करण्याची अडचण
या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती महसूल व कृषी विभागाने ऑनलाईन केंद्र सरकारकडे पाठविली. तसेच पात्र शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बँक खाते क्रमांक सुध्दा त्यात जोडले. मात्र यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा न होण्याचे कारण गुलदस्त्यात आहे.
शेतकऱ्यांची बँकामध्ये पायपीट कायम
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. याचा संदेश देखील संबंधित पात्र शेतकऱ्याच्या मोबाईलवर पाठविला जात आहे. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली नसल्याने त्यांची बँकामध्ये पायपीट कायम आहे. विशेष यासंबंधिची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सुध्दा मिळत नसल्याचे शेतकऱ्यांची अडचण होत आहे.