वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 08:55 PM2018-01-07T20:55:24+5:302018-01-07T20:55:40+5:30
शेतात लावलेल्या तुरीच्या झाडांचे हरिण व रानडुकरांनी शेतात धुमाकुळ घालून फस्त केल्या. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी (डाकराम) : शेतात लावलेल्या तुरीच्या झाडांचे हरिण व रानडुकरांनी शेतात धुमाकुळ घालून फस्त केल्या. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.
तिरोडा तालुक्यातील आलेझरी-बालापूर येथील प्रगतीशील शेतकरी खेमराज बघेले, खुमेश बघेले, संदीप बघेले, नितीन बघेले व रमेश बघेले यांनी आपल्या १५ ते १८ एकर शेतामध्ये तुर पिकाची लागवड केली होती. तुरीची झाडे खूप उंच असून एका-एका झाडाला जवळपास ४ ते ५ किलो तुरीचे उत्पादन निघेल,ऐवढ्या शेंगा झाडांना लागल्या होत्या. मात्र या परिसराला जंगल लागून असल्याने शेत वन्यप्राण्यांचा नेहमी वावर असतो. रानडुकरे व हरिणांच्या कळपांनी या तुरीच्या शेंगा झाडाला मोडून खाऊन फस्त करून टाकल्या. १५ ते १८ एकरामध्ये कमीत-कमी तुरीचे उत्पादन २० ते २५ क्विंटल होणार होते. पण आता एक क्विंटलसुध्दा होणार नाही. सहा हजार रुपये क्विंटल तुरीचा दर आहे. तर १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला याची माहिती देण्यात आली आहे. मात्र याकडे वनविभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रगतीशील शेतकरी बघेले यांनी केला आहे. शासनाने कमीत कमी २ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खुमेश बघेले यांनी केली आहे.