धानाला हमीभाव, मग मोहफुलाला का नाही? शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 11:06 AM2022-04-26T11:06:33+5:302022-04-26T11:26:11+5:30

धानाप्रमाणेच मोहफुलांची हमीभावाने शासकीय खरेदी केल्यास आदिवासीबहुल भागातील शेतकऱ्यांना त्याची मदत होऊ शकते.

Farmers demand government to buy Mahua flower with msp | धानाला हमीभाव, मग मोहफुलाला का नाही? शेतकऱ्यांचा सवाल

धानाला हमीभाव, मग मोहफुलाला का नाही? शेतकऱ्यांचा सवाल

Next
ठळक मुद्देहमीभाव जाहीर केल्यास होणार मदत चारशे कोटी रुपयांची उलाढाल

अंकुश गुंडावार

गोंदिया : पूर्व विदर्भात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. शासनाकडून हमीभावाने धानाची खरेदीसुध्दा केली जात असल्याने शेतकऱ्यांना त्याची मदत होते, तर याच भागात उन्हाळ्याच्या दिवसात एक ते सव्वा लाख मेट्रिक टन मोहफुलाचे संकलन केले जाते. यातून जवळपास चारशे कोटी रुपयांची उलाढाल होत असून, ग्रामीण भागात रोजगारदेखील मिळतो. त्यामुळे धानाप्रमाणेच मोहफुलांची हमीभावाने शासकीय खरेदी केल्यास आदिवासीबहुल भागातील शेतकऱ्यांना त्याची मदत होऊ शकते.

अनेक प्रकारचे पोषक घटक असलेल्या मोहफुलांपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनविले जातात. पण, मोहफुलांचा जास्तीत जास्त वापर हातभट्टीची गावठी दारू बनविण्यासाठीच केला जातो. या गावठी दारूचे आकर्षण विदेशी दारू पिणाऱ्यांनाही असते. असे असताना आतापर्यंत मोहफुलांपासून देशी दारूसुद्धा बनविण्याची परवानगी नव्हती.

राज्य मंत्रिमंडळाने मोहफुलांपासून थेट विदेशी दारू बनविण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोहफुले गोळा करणाऱ्यांना मोठा आधार मिळाला. धान उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये व त्यांना हमीभाव मिळावा, यासाठी शासनाकडून हमीभावाने धानाची खरेदी केली जाते. तशीच मोहफुलांची खरेदी केल्यास गोरगरिबांची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल होणार नाही. त्यामुळेच मोहफुलाची हमीभावाने खरेदी करण्याची मागणी केली जात आहे.

प्रस्तावाकडे शासनाचे दुुर्लक्ष

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यांसह धुळे आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुलाचे उत्पादन घेतले जाते. तसेच या जिल्ह्यांमध्ये शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. याच केंद्रावर मोहफुलांची खरेदी केली जावी, यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला; पण अद्यापही यावर कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही.

मोहफूल काढणीचा हंगाम सुरू

सध्या मोहफूल काढणीचा हंगाम सुरू आहे. मोहफूल गोळा करून उन्हात वाळवल्यानंतर त्याची विक्री केली जाते. यामुळे आदिवासीबहुल आणि वनपरिक्षेत्रालगत असलेल्या गावकऱ्यांना रोजगाराची संधी प्राप्त होते. मात्र व्यापारी कमी दराने मोहाफुलाची खरेदी करीत असल्याने शेतकरी आणि गोरगरीब नागरिकांची लूट होत आहे.

दोन महिन्यांत होते चारशे कोटींची उलाढाल

मोहफुले संकलित करण्याचा हंगाम हा जवळपास दोन महिन्यांचा असतो. पूर्व विदर्भात जवळपास एक ते सव्वा लाख टन मोहफुलाचे संकलन होते. यातूच जवळपास चारशे कोटी रुपयांची उलाढाल होते.

Web Title: Farmers demand government to buy Mahua flower with msp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.