देवरी तालुक्यातील शेतकरी पावसाविना हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:28 AM2021-08-29T04:28:20+5:302021-08-29T04:28:20+5:30
देवरी : ऑगस्ट महिना अखेरीस आला तरी अद्याप तालुक्यात जोरदार पाऊस झाला नाही. पाण्याची ओढ आणि उन्हाचा जोर वाढल्याने ...
देवरी : ऑगस्ट महिना अखेरीस आला तरी अद्याप तालुक्यात जोरदार पाऊस झाला नाही. पाण्याची ओढ आणि उन्हाचा जोर वाढल्याने पिकांना झळ बसत असल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. तलाव, नाले, बंधारे व जलाशयातील पाणीपातळी खालावली आहे. या स्थितीमुळे बळीराजासोबतच सामान्य नागरिकांवर सुद्धा जलसंकट ओढवल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यातील सर्वच क्षेत्रात सध्या पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामात मान्सूनच्या सुरुवातीला रिमझिम व तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. पावसाच्या ओलीवरच बळीराजाने खते, औषधे, बी-बियाणे व मशागतीवर हजारो रुपये खर्च करून पेरणी केली. पिकांची उगवणही चांगली झाली. पिकांची वाढही चांगली होऊ लागली, पण ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. सध्या प्रखर उन्हाने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकरी उपलब्ध पाणी पिकांना देत होते, पण त्यालाही थकीत बिलापोटी वीज कनेक्शन तोडल्याचा फटका बसत आहे. तर तालुक्यातील ७० टक्के शेती पावसावरच अवलंबून असल्याने बळीराजाला दमदार पावसाची गरज आहे. दुसरीकडे सामान्य नागरिकांना पाऊस न पडल्याने शिरपूर जलाशय न भरल्याने येणाऱ्या दिवसांत देवरी शहराचा पाणीपुरवठा प्रभावित होणार याची भीती वाटत आहे. देवरी शहराला शिरपूर जलाशयातून पाणीपुरवठा होतो. सध्या या जलाशयाची पाणी पातळी खालावल्याने येणाऱ्या दिवसांत पिण्याच्या पाण्यासाठी देवरीवासीयांना भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे.