शेतकरी मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:00 AM2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:04+5:30
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित व्यक्तींना तसेच पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सुधारित निर्णय घेतला.ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही.
संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मधील अतिवृष्टी व पूरबाधित व्यक्तींन आणि पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांना ६९ कोटी रुपये मंजूर केले. मात्र गोंदिया जिल्ह्यात आॅगस्ट व सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या धानपिक नुकसानीचे सर्वेक्षण होऊनही मदत देण्यात आली नाही.या प्रकारामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित व्यक्तींना तसेच पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सुधारित निर्णय घेतला.ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी पीक कर्ज घेतले नाही. परंतु त्यांच्या पिकांची अतिवृष्टी व पुरामुळे किमान ३३ टक्के नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना कमाल हेक्टरच्या मर्यादेत शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीनुसार अनुज्ञेय असलेल्या मदत दराच्या तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्यास मान्यता दिली आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी मागणी केलेला ६८ कोटी ९४ लक्ष २७ हजार रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
पूर्व विदर्भाच्या नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या नुकसानीचा लाभ मिळणार आहे. मात्र ऑगस्ट व सप्टेंबर २०१९ या महिन्यात गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर हानीमुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३ ते ६ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली.
संबंधित विभागाद्वारे नुकसानीचे सर्वेक्षण होऊन अहवाल सादर करण्यात आला. यात जानवा, येगाव, खामखुरा, इसापूर, इटखेडा, डोंगरगाव, महागाव, सिरोली, नवनीतपूर, काटगाव, वडेगावबंध्या, बोळदे, करडगाव, माहूरकुडा, मालकनपुर, निलज, रामघाट, तुमडीमेंढा, गवरा भरनोली, केशोरी, परसोडी रयत, सिलेझरी अशा २३ गावातील ४५२ शेतकºयांच्या ६६.४८ हे आर शेतातील ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. तर या सर्व गावातील १०५.२९ हे.आर. शेत जमिनीतील धान पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने सादर करण्यात आला. आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोंदिया तालुक्यात सुमारे १२०० हे.आर. शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे.त्यासाठी १.७५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
एवढे असतानाही शासनाने १७ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयात जी मदतीची आकडेवारी दर्शविण्यात आली आहे. त्यात गोंदिया जिल्ह्याला वगळण्यात आले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कालावधीत जिल्ह्यातील इतर तालुक्यात नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हानिहाय मिळालेल्या निधीचा गोषवारा
नागपूर ९२०९८०० कोटी
वर्धा ३६७२०००
भंडारा ८३६५४०००
गोंदिया ०००००००
चंद्रपूर २०८१७००००
गडचिरोली ३०१८३३०००