खरीपानंतर रब्बीकडूनही शेतकऱ्यांची निराशाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:50 AM2018-06-07T00:50:24+5:302018-06-07T00:50:24+5:30
पर्यावरणातील बदलाचे परिणाम झपाट्याने शेतीवर होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्याने पर्जन्यमानात सुद्धा दिवसेंदिवस घट होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षी खरीप हंगामात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगाम हातून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पर्यावरणातील बदलाचे परिणाम झपाट्याने शेतीवर होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्याने पर्जन्यमानात सुद्धा दिवसेंदिवस घट होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षी खरीप हंगामात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगाम हातून गेला. त्यामुळे ही भरपाई रब्बी हंगामात भरुन काढू अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र यातही त्यांची निराशाच झाली.
जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी धानाची ३० हजार हेक्टरवर लागवड केली जाते. मात्र मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने व सिंचन प्रकल्पाचे पाणी रब्बी हंगामातील पिकांना देण्यास शासनाने मनाई केली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली नाही.
त्यामुळे रब्बी हंगामातील धानाच्या लागवड क्षेत्रात सुध्दा घट झाली. तर वातावरणातील बदलाचा सुद्धा उत्पादनावर परिणाम झाला. मागील वर्षी रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ५ जूनपर्यंत एकूण ५६ धान खरेदी केंद्रावरुन १ लाख ४६ हजार ७६२ क्विंटल धानाची खरेदी केली होती. तर यंदा केवळ १५ हजार ५०१ क्विंटल धानाची खरेदी केली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात पाच हजार हेक्टरने घट झाली त्यामुळे उत्पादनात ४० हजार क्विंटलने घट ग्राह्य आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत निम्मे सुध्दा धानाचे उत्पादन झालेले नाही.
धानाच्या उत्पादनात ९० टक्के घट झाली असून त्याचा फटका शेतकºयांना बसल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे.
पिकांचा पॅर्टन बदलण्याची गरज
जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही पारंपरिक पिकांची लागवड करतात. एकाच प्रकारच्या पिकांच्या लागवडीमुळे जमिनीची पोषकता कमी होत चालली आहे. त्याचाच परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांना बगल देत इतर कमी पाण्याच्या पिकांची लागवड करण्याची गरज असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चिंता कायम
रब्बी हंगामातील उत्पादनानंतर हाती येणाऱ्या पैशातून जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाची तयारी करतात. खते, बियाणे, मजुरांचा खर्च तसेच पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी खर्च करतात. मात्र मागील वर्षी खरीपानंतर रब्बी हंगाम सुध्दा शेतकºयांच्या हातून गेल्याने खरीप हंगामात पैशाची जुळवाजुळव कुठून करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.