गोरखनाथ धानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:05 AM2019-09-01T00:05:24+5:302019-09-01T00:05:49+5:30
पूर्व विदर्भातील शेतकऱ्याला धानाच्या शेतीशिवाय पर्याय नाही. गोंदिया जिल्ह्यात यंदा १४० फोर्ड गोरखनाथ या प्रजातीचे धान ज्या-ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १४० दिवसाचे जे धान लावण्यात आले ते धान फक्त ७० दिवसातच निघाले आणि तेही धान पोचट आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कर्जाचे डोंगर कमी करण्यासाठी शेतात राबराब राबणाऱ्या जिल्हाभरातील अनेक शेतकºयांची यंदा फसवणूक झाली. १४० दिवसात निघणाऱ्या धानाचे बियाणे शेतकऱ्यांनी लावले. मात्र ते धान ७० दिवसातच निघाले. हा प्रकार डव्वा येथे उघडकीस आल्यानंतर हे बियाणे लावणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची पाहणी केली. परिणामी त्यांचीही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करायला सुरूवात केली आहे.
पूर्व विदर्भातील शेतकऱ्याला धानाच्या शेतीशिवाय पर्याय नाही. गोंदिया जिल्ह्यात यंदा १४० फोर्ड गोरखनाथ या प्रजातीचे धान ज्या-ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १४० दिवसाचे जे धान लावण्यात आले ते धान फक्त ७० दिवसातच निघाले आणि तेही धान पोचट आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. लाखो रूपये खर्च करून शेतात राबराब राबूनही कवडीचे धान घरात जाणार नसल्याचे शेतकऱ्यांना संपूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागणार आहे. शिवाय धानाच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा वाया जाणार असून शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील सडक-अजुनी तालुक्याच्या डव्वा, चिरचाळी, डोंगरगाव व कोदामेळी या चार गावातील शेतकऱ्यांचे धान पोचट निघाल्याने त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी अनूप शुक्ला यांच्याकडे तक्रार केली. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच ज्या शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात ह्या धानाची लागवड केली त्या धानाची पाहणी केली. त्यांच्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता त्यांनी आपापल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. नाथ बायोजीनिक्स या कंपनीचे फोरर्ड १४० गोरखनाथ या नावाचे धान ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांचे १४० दिवसाचे धान ७० दिवसातच पोचट निघत आहेत.
यासंदर्भात देवरी तालुक्याच्या शिलापूर येथील येथील अरूण सखाराम मेंढे व सडक-अर्जुनी तालुक्यातील राका येथील शेतकऱ्यांच्या शेतातही असेच घडले. ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली त्या शेतकºयांना कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली.
कृषी अधीक्षक कार्यालयाकडून चौकशी
१४० फोर्ड गोरखनाथ ह्या धानाचे बियाणे ज्या शेतकऱ्यांनी लावले त्या शेतकऱ्यांचे १४० दिवसाचे धान ७० दिवसातच पोचट निघाले.लोकमतने यावर वृत्त प्रकाशित करताच खळबळून जागा झालेल्या कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत कोणकोणत्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली, या संदर्भात चौकशी करणे सुरू केले आहे.
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिले पत्र
गोरखनाथ नावाचे जे बियाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावले त्या शेतकऱ्यांचे धान १४० दिवसापेक्षा ७० दिवसातच निघाले का ज्यांच्या शेतात असा प्रकार घडला असेल अश्या शेतकऱ्यांनी आपापल्या तक्रारी आपल्या तालुक्यातील जि.प.चे कृषी अधिकारी व स्टेटचे कृषी अधिकारी यांच्याकडे करावी. संबधीत तालुका कृषी अधिकाऱ्यांची या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र जिल्हा कृषी संवर्धन अधिकारी यांनी दिले आहे.
ज्या शेतकºयांच्या शेतातील धान पोचट निघत आहेत. त्या शेतकऱ्यांनी भात बियाणाची खरेदी केली त्याचे बिल सांभाळून ठेवावे. यासंदर्भात रितसर तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करावे.
-अनुप शुक्ला, जिल्हा कृषी अधिकारी, जि.प. गोंदिया.