शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:07 PM2019-06-27T22:07:03+5:302019-06-27T22:07:28+5:30
पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करण्यास पुन्हा पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी करण्यास पुन्हा पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.
गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ९२ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी जमिनीत किमान पाच इंचापर्यत ओलावा निर्माण होणे आवश्यक आहे. मात्र यंदा जून महिना पूर्ण लोटत असताना मृगापोठोपाठ आद्रा नक्षत्र सुध्दा कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांवरील संकटात वाढ झाली आहे. मृगाचा दमदार पाऊस होताच शेतकरी पेरणीला सुरुवात करतात. पण यंदा अद्यापही पावसाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. रोज आकाशात ढग दाटून येत आहे मात्र पाऊस पडत नसल्याने वातावरणात सुध्दा उकाडा निर्माण होत आहे. पाऊस लांबत असल्याने पेरण्यांना उशीर होत असून शेतकऱ्यांच्या काळजीत सुध्दा वाढ होत आहे. पेरणीस उशीर झाल्याने रोवणी देखील लांबणार असून यामुळे याचा उत्पादनावर सुध्दा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाच्या अधिकाºयांनुसार धानाची पेरणी ही १५ जुलैपर्यंत करता येते . त्यामुळे पेरणी करण्यास पुन्हा २० दिवसांचा कालावधी शिल्लक असून शेतकºयांनी पेरणी करण्याची घाई करु नये असे सांगितले. १५ जुलैपर्यंत पाऊस झाल्यास शेतकºयांनी हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड करावी ज्यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार नाही.
यंदा पाऊस लांबल्याने पेरण्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. मात्र धानाची पेरणी करण्यास पुन्हा २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकºयांनी घाई न करता काही दिवस प्रतीक्षा करावी. चांगला दमदार पाऊस झाल्यानंतरच धानाची पेरणी करावी.
- नंदकिशोर नयनवाड
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.