जोडधंद्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार ४०३ गोठे
By admin | Published: May 16, 2017 12:57 AM2017-05-16T00:57:26+5:302017-05-16T00:57:26+5:30
तालुक्यात शेतकऱ्यांना व्ययक्तीक लाभाच्या योजनेतून गुरांचे गोठे मिळणार आहेत. ४०३ लाभार्थ्यांसाठी जि.प. स्थायी समतीच्या सभेत मंजुरी मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुक्यात शेतकऱ्यांना व्ययक्तीक लाभाच्या योजनेतून गुरांचे गोठे मिळणार आहेत. ४०३ लाभार्थ्यांसाठी जि.प. स्थायी समतीच्या सभेत मंजुरी मिळाली आहे.
जि.प. गोंदिया अंतर्गत अनेक दिवसांपासून जनावरांसाठी गोठे, शेळी व कुक्कुट पालनासाठी शेड यासाठी प्रस्ताव प्रलंबित होते. परंतु स्थायी समितीचे सदस्य सुरेश हर्षे यांनी सदर प्रकरणाचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांसाठी ४०३ गोठे व शेड मंजूर करवून घेतले.
जि.प. गोंदियाच्या व्यवक्तीक लाभाच्या योजनेत शेतकऱ्यांकरिता शेळी पालन, कुक्कुट पालन यासाठी शेड व जनावरांचे गोठे तयार केले जाणार आहेत. त्यामागे शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावणे व रोजगार निर्माण करणे, हा हेतू आहे. निधी मंजूर झाला असून स्थायी समितीच्या सभेत कामे सुरू करण्याविषयी माहिती देण्यात आली.
अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना शेतीसह जोडधंदा मिळावा यासाठी जनावरे, शेळी पालन, कुक्कुट पालन यासाठी शेड व गोठे उपलब्ध व्हावे यासाठी जि.प. सदस्य सुरेश हर्षे प्रयत्नशील होते. अनेकदा त्यांनी या मुद्यांवर स्थायी समितीची सभा गाजविली.
राजकारण व कागदोपत्री संघर्षानंतर अखेर ११ मे रोजी स्थायी समितीत बोदा, ठाणा, वळद, सुपलीपार, सावंगी, खुर्शीपारटोला, पद्मपूर, माल्ही, फुक्कीमेटा, गिरोला, तिगाव, धामणगाव, आसोली, जवरी, बोथली, जामखारी, बनगाव, भोसा, कुंभारटोली, गोसाईटोला, टाकरी, कालीमाटी, कातुर्ली, करंजी, कट्टीपार आदी गावांसाठी सदर लाभ मंजूर करण्यात आला आहे.
असा मिळणार लाभ
आमगाव तालुक्यातील ४०३ लाभार्थ्यांसाठी मंजुरी मिळाली आहे. यात जनावरांच्या गोठ्यासाठी प्रति लाभार्थी एक लाख ११ हजार २०० रूपये प्रति लाभार्थी, शेळ्यांच्या शेडसाठी ५५ हजार २०० रूपये प्रति लाभार्थी व कुक्कुट पालनाच्या शेडसाठी ४८ हजार रूपये प्रति लाभार्थी असा लाभ मिळणार असल्याचे जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांनी सांगितले.