शेतकऱ्यांनो, तुम्ही बोगस बियाणे कसे ओळखाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:28 PM2024-05-08T18:28:00+5:302024-05-08T18:28:38+5:30
Gondia : शेतकऱ्यांची सतर्कता महत्त्वाची कृषी विभागही 'अलर्ट मोड'वर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खरीप हंगाम एका महिन्यावर येऊन ठेपला असून, यंदा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अनधिकृत, बोगस बियाण्यांची एन्ट्री होऊ नये म्हणून कृषी विभागाची सात भरारी पथकेही सतर्क झाली. शेतकऱ्यांनी अनधिकृत, बोगस बियाणे कसे ओळखावे? याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे.
निवडणूक आटोपल्यानंतर जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाने देखील 'अलर्ट मोड'वर येत खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू केली. शेतकरी देखील शेती मशागतीच्या कामांकडे वळले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामात १ लाख ९३ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले. हा धान उत्पादक भाग असल्याने यंदाही खरीप हंगामात धानाची सर्वाधिक १ लाख ८४ हजार हेक्टरवर लागवड होणार आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने बी बियाणे, कीटकनाशके यांचे नियोजन केले आहे.
असे ओळखा बोगस बियाणे
शासनाचा उत्पादन अथवा विक्री परवाना नसणे, बीज प्रमाणीकरण यंत्रणे- कडून प्रमाणित नसलेले बियाणे, तपासणी केल्याचा रिपोर्ट नसल्यास बियाणे अनधिकृत किंवा बोगस असल्याचे मानले जाते. बोगस बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली याचा उल्लेख नसतो. पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते.
काळजी काय घ्यावी?
अधिकृत परवानाधारक कृषी विक्रेत्यांकडून बियाणे, खते खरेदी करावी. खरेदीवेळी न चुकता पक्के बिल घ्यावे. देयकात पीक, वाण प्लॉट क्रमांक, वजन, अंतिम मुदत, कंपनीचे नाव संपूर्ण नमूद असावे. कृषी केंद्रधारकाने पक्के बिल संपूर्ण विवरणासह न दिल्यास नजीकच्या कृषी विभागाकडे संपर्क साधावा.
नियंत्रण कक्षाची स्थापना
जिल्ह्यात खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कीटकनाशकाचा पुरवठा व निविष्ठांचा काळाबाजारावर प्रतिबंधासाठी तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) मध्ये तक्रार दाखल करावी. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व समस्यांचे निराकरण नियंत्रण कक्षात करण्यात येणार आहे. बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी करतेवेळेस शेतकऱ्यांना विविध अडचणी येतात. या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनो येथे नोंदवा तक्रार
नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किमत, साठेबाजी व लिकिंगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. अतिरिक्त दराने खताची विक्री होत असल्यास बियाणे, खते खरेदीचे बिल मिळत नसल्यास शेतकऱ्यांनी आपल्या नावासह व संपूर्ण पत्ता, तक्रारीचे स्वरूप यांची माहिती देऊन निवारण कक्षात तक्रार नोंदवावी.
खरीप हंगामासाठी खते, बियाणे यांची पुरेशा प्रमाणात मागणी नोंदविण्यात आली. उर्वरित लागणारे बियाणे शेतकऱ्यांकडे घरगुती पद्धतीने जतन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात अनधिकृत बियाण्यांचा शिरकाव होणार नाही याची दक्षता म्हणून आठ भरारी पथके सक्रिय ठेवण्यात आली.
- हिंदूराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी