शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
By admin | Published: June 24, 2016 12:03 AM2016-06-24T00:03:19+5:302016-06-24T00:03:19+5:30
पावसाची चाहुल देणारे रोहिणी आणि मृग नक्षत्र लोटले तरी पावसाने अजून जिल्हावासीयांना ओलेचिंब केले नाही.
गोंदिया : पावसाची चाहुल देणारे रोहिणी आणि मृग नक्षत्र लोटले तरी पावसाने अजून जिल्हावासीयांना ओलेचिंब केले नाही. त्यामुळे आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला निराशाच आली. आता आर्द्रा नक्षरातही नुसतेच ढग गोळा होऊन हुलकावणी देत आहे. त्यामुळे पावसाच्या आशेने रोपवाटिका टाकणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
सध्या आर्द्रा नक्षत्र सुरू आहे. यात तरी चांगला पाऊस पडेल व बियाण्यांची पेरणी करता येईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र पुन्हा अपेक्षाभंगाचे दु:ख शेतकऱ्यांच्या नशिबी आले. जिल्ह्यात १७ हजार ५०० हेक्टर रोपवाटिकेचे क्षेत्र आहे. आता जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अद्याप चांगला पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपवाटिका लावणे बंद केले असले तरी ज्यांनी आधीच बियाणे टाकले ते वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ ओलिताची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना थोडी हिंमत आहे.
सध्या जिल्ह्यात एक हजार ९०१ हेक्टरमध्ये रोपवाटिका घालण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली. आर्द्रा नक्षत्रात दमदार पाऊस पडेल, तलाव, बोडी भरून जाईल, अशी शेतकऱ्यांची आशा असते. मात्र पावसाच्या या नक्षत्रात उन्हाळ्याचाच भास होत आहे. तीव्र ऊन व उकाड्याने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे.
मागील वर्षीसुद्धा पावसाने योग्य साथ दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करण्याची पाळी आली होती. यंदा तर आणखीच बिकट परिस्थिती दिसून येत आहे. १० दिवसांपूर्वी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे पेरण्यास सुरूवात केली. परंतु त्यानंतर अद्याप पावसाचे दर्शन झाले नाही. त्यामुळे उगवलेली खार करपण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी रोपवाटिका उगवलीच नाही. शेतात रोपवाटिकेसाठी टाकलेले दाने पशूपक्षी टीपत आहेत. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. तरीही हिंमत न सोडता जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे नजरा लावून आहेत.
पाऊस येत नसला तरी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची सुविधा आहे, ते रोपवाटिकेसाठी बियाणे पेरत आहेत. मात्र जे शेतकरी पूर्णत: वरथेंबी पावसावर अवलंबून आहेत, त्यांनी बियाणे पेरणे थांबविलेले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३०.८ मिमी पाऊस झालेला आहे. मात्र रोपवाटिकेसाठी १५० मिमी पावसाची गरज असते.
जोपर्यंत १५० मिमी पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी बियाणे पेरू नये, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात यंदा चक्रिवादळाने कहर केला. मात्र पुरेशा प्रमाणात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे रोपवाटिकेचे क्षेत्र सध्या अत्यल्प आहे. गोंदिया तालुक्यात ११९ हेक्टरमध्ये, तिरोडा तालुक्यात ७५० हेक्टरमध्ये, आमगाव ९५, गोरेगाव २४०, सालेकसा १४.५०, देवरी ४२, अर्जुनी-मोरगाव ४८० व सडक-अर्जुनी तालुक्यात १६० हेक्टरमध्ये अशी जिल्ह्यात एकूण एक हजार ९०१ हेक्टरमध्ये रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. केवळ सालेकसा तालुक्यात १२.३० हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय तुरीसारख्या बांधावरच्या पिकांची २७ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे.
दुबार पेरणीचे संकट
केवळ एकदाच आलेल्या पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या रोपवाटिका वाळू लागल्या आहेत. ज्यांनी रोपवाटिकेसाठी बियाणे घातले, उन्हामुळे ते अंकुरीतच झाले नाही. ते दाने पोपट व इतर पक्षी टिपत आहेत. शिवाय ज्यांची रोपवाटिका काही प्रमाणात उगवली आहे, तेथे ओलावा रहावा यासाठी शेतकरी मोटारपंपच्या सहाय्याने पाणी देत आहेत. मात्र पाण्याच्या शोधात रानडुकरे तिथे येवून रोपवाटिका नष्ट करीत आहेत. या सर्व कारणांमुळे दुबार पेरणी करण्याचे संकट घोंघावत आहे.