बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:02 PM2019-06-11T22:02:27+5:302019-06-11T22:03:36+5:30
सध्या खरीप हंगाम सुरू असून विविध कंपन्याचे बियाणे बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. परिणामी या कंपन्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली असून अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी या कंपन्यांचे मार्केटिंग प्रतिनिधी सूट देण्याचे कूपन छापून शेतकऱ्यांची दिशाभूल करुन लूट करीत असल्याचा प्रकार सडक अर्जुनी तालुक्यात उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या खरीप हंगाम सुरू असून विविध कंपन्याचे बियाणे बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. परिणामी या कंपन्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली असून अधिकाधिक ग्राहक मिळविण्यासाठी या कंपन्यांचे मार्केटिंग प्रतिनिधी सूट देण्याचे कूपन छापून शेतकऱ्यांची दिशाभूल करुन लूट करीत असल्याचा प्रकार सडक अर्जुनी तालुक्यात उघडकीस आला आहे.
सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. हीच बाब हेरुन विविध बियाणे कंपन्या सुध्दा खरीप हंगामाच्या तोंडावर सक्रीय झाल्या आहेत. खरीपासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या धानाच्या बियाणांची गरज लक्षात घेवून वर्धा येथील यशोदा सिड्स कंपनीच्या एजंटनी तालुक्यातील अनेक शेतकºयांकडून यशोदा १३१२, अहिल्या, हरिमाऊली, अंबिका, चायना राईस, आर.एच.१० या प्रजातीच्या धानाची बुंकीग करुन घेतली.ज्या शेतकºयांनी या धानाची बुंकीग केली त्या शेतकºयांना धानाच्या प्रती बॅगवर १५० रुपयांची सूट मिळेल यासंबंधिचे एक कूपन दिले आहे. शिवाय हे कूपन ज्या कृषी केंद्रातून शेतकरी धानाची खरेदी करतील त्या दुकानातून त्यांना सूट दिली जाईल असे सांगितले जात आहे. या कंपनीच्या एजंटनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेकडो शेतकºयांना कुपनचे वितरण करुन बुकींग करुन घेतले. शेतकऱ्यांनी सुध्दा बियाणे खरेदी करताना आपले चारपाचशे रुपये वाचतील या आशेने धानाची बुकींग करुन घेतली.मात्र प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी हे कुपन घेवून कृषी केंद्रात धानाचे बुकींग करण्यासाठी जात आहेत तेव्हा त्यांना सदर दुकानदार या कंपनीचे बियाणे घेतल्यानंतर सुध्दा कुठलीच सूट देत नसल्यानंतर शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील दिलीप गायकवाड, परसराम राऊत, गोपी भोयर, राजाराम झिंगरे, यशवंत गायकवाड, भाऊराव शेंडे, प्रल्हाद गायकवाड, सुभाष बागडे, छगनलाल खोब्रागडे या शेतकऱ्यांनी या कंपनीचे बियाणे खरेदी करुन सुध्दा त्यांना दिलेल्या कूपननुसार सूट देण्यात आली नाही.त्यामुळे त्यांनी याची कृषी विभागाकडे तक्रार करुन सदर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
एकाच कंपनीच्या बियाण्यांचे भिन्न दर
कंपनी कुठलीही असली तरी त्या बियाणांचे दर सर्वच दुकानात एकसारखे असण्याची गरज आहे. मात्र यशोदा कंपनीच्या बियाणांचे दर कृषी केंद्र संचालक आपल्या मनमर्जीने आकारात आहे.प्रती बॅग मागे बियाणांच्या दरात ७० ते ८० रुपयांची तफावत असून शेतकऱ्यांची दिशाभूल व लूट केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
कृषी विभागाचे भरारी पथके गायब
खरीप हंगामाला सुरूवात झाली असून विविध कंपन्याचे बियाणे बाजारात आले आहे. त्यामुळे शेतकºयांची दिशाभूल होवू नये यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकाने शोध मोहीम राबवून अशा बियाणे कंपन्यांवर कारवाही करण्याची गरज आहे. मात्र जिल्ह्यातून कृषी विभागाचे भरारी पथकच गायब झाले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्थायी समितीत मांडणार मुद्दा
जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालकाकडून आणि बियाणे कंपन्याकडून शेतकºयांची सरार्सपणे दिशाभूल केली जात आहे. मात्र अद्यापही एकाही केंद्रावर कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या भुमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे बुधवारी आयोजित स्थायी समितीच्या सभेत हा मुद्दा उपस्थित करुन सदर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सांगितले.