पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 22:11 IST2019-08-28T22:10:14+5:302019-08-28T22:11:21+5:30
पाटबंधारे विभागातंर्गत पाणी वापरासाठी वापरला जाणारा पाणसारा शासनाने माफ केला होता.यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला होता.मात्र पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना दिलेल्या २०१८-१९ च्या पाणसाऱ्याच्या रक्कमेत २०१६-१७ ची पाणसाऱ्याची रक्कम जोडून शेतकऱ्यांना बिल पाठविण्यात आले आहे.

पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल
लोकमत न्यूज नेटवर्क
गुलाबटोला : पाटबंधारे विभागाच्या वतीने तिरोडा तालुक्यातील चोरखमारा जलाशयाचे लाभार्थी शेतकऱ्यांना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात संपूर्ण पाणसारा शासनातर्फे माफ करण्यात आला आहे. मात्र २०१८-१९ मध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मागणी बिलात सुट दिलेली रक्कम सुध्दा जोडण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकार चक्क शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप किसान गर्जनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र पटले यांनी केला आहे.
जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी काही सवलती जाहीर केल्या होत्या. यात पाटबंधारे विभागातंर्गत पाणी वापरासाठी वापरला जाणारा पाणसारा शासनाने माफ केला होता.यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला होता.मात्र पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना दिलेल्या २०१८-१९ च्या पाणसाऱ्याच्या रक्कमेत २०१६-१७ ची पाणसाऱ्याची रक्कम जोडून शेतकऱ्यांना बिल पाठविण्यात आले आहे.
यामुळे शेतकरी सुध्दा संभ्रमात आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच कंबरडे मोडले असताना आता अतिरिक्त पाणसाऱ्याची रक्कम कुठून भरायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. दुसरीकडे शासनाने पाणसाऱ्याच्या रक्कमेत सुट दिली असताना सुध्दा ती पाटबंधारे विभागाकडून सक्तीने वसूल केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याचा आरोप केला आहे.
त्यामुळे हा प्रकार त्वरित थांबविण्याची मागणी किसान गर्जनेचे महेंद्र पटले यांनी केली आहे.अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.