शेतकऱ्याची पैशांची थैली हिसकावून नेली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:33 AM2021-09-24T04:33:55+5:302021-09-24T04:33:55+5:30
गोरेगाव : धानाच्या बोनसचे पैसे थैलीत टाकून नेत असताना चोरट्यांनी शेतकऱ्याची थैली हिसकावून नेल्याची घटना येथील विदर्भ कोंकण ग्रामीण ...
गोरेगाव : धानाच्या बोनसचे पैसे थैलीत टाकून नेत असताना चोरट्यांनी शेतकऱ्याची थैली हिसकावून नेल्याची घटना येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत बुधवारी (दि.२२) घडली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यांच्या एका साथीदाराला लगेच पकडण्यात आले आहे.
तालुक्यातील ग्राम मुरदोली येथील रहिवासी जियालाल कटरे (७१) यांनी धानाच्या बोनसचे २२ हजार रुपये बुधवारी बँकेतून काढले. यातील ५०० रुपये नातू अभिषेकला मोबाइल रिचार्ज करण्यासाठी दिले. उर्वरित २१ हजार ५०० रुपये प्लास्टिकच्या थैलीत ठेवले. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांची पैशांची थैली जबरीने हिसकावून पसार झाले. येथील रहिवासी शंभू पटले यांनी त्या दोघा चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे, हा प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यात दोन चोरट्यांचा सहकारी बँक परिसरात फिरत असताना दिसून आल्याने त्याला लगेच पकडण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता ते दोघे सहकारी असल्याची त्याने कबुली दिली. याप्रकरणी फिर्यादी जियालाल कटरे यांच्या तक्रारीवरून आरोपींवर भादंवि कलम ३९२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन मैत्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार विलास जाधव करीत आहेत.