शेतकºयांनो, सेंद्रिय शेतीची कास धरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:13 PM2017-09-29T23:13:51+5:302017-09-29T23:24:05+5:30
गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे या उत्पादित धानातून एक प्रकारे विषच खाण्यात येत आहे. भविष्यातील धोके ओळखून व उत्पादित धानाला चांगला भाव मिळावा. आरोग्य सुदृढ राहावे आणि जमिनीची पोत सुधारावी यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे मत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.
कारंजा येथील तालुका बीज गुणन प्रक्षेत्रातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालयाच्या वतीने प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी सेंद्रिय तांदळापासून तयार केलेला भात खाऊ घालण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधताना काळे बोलत होते. आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.टी. शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित होते. काळे म्हणाले, जिल्ह्यासाठी कृषी आयुक्तालयाने परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये २० गटांना मंजुरी दिली आहे.
प्रती गट ५० शेतकºयांना व प्रती शेतकरी १ एकर याप्रमाणे योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येणाºया ३१ गटांना सन २०१७-१८ वर्षाकरिता सेंद्रिय शेती राबविण्याची मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात एकूण ५१ सेंद्रिय गटामध्ये २,३४६ शेतकरी सेंद्रिय शेती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. धान उत्पादक शेतकºयांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
दररोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेला भात हा विषमुक्त कसा राहील, याचे नियोजन करण्यात आले आहे. सेंद्रिय तांदूळ उत्पादनामुळे शेतकºयांना त्याची चांगली किंमत सुध्दा मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पादनसुध्दा वाढण्यास मदत होणार आहे. पक्षांनासुध्दा विषमुक्त अन्न मिळेल.
जिल्हा नियोजन समितीतून तरतूद
जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची चळवळ बळकट व्हावी, यासाठी जिल्हा नियोजन
समितीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी निधीची तरतूद करणारा राज्यातील गोंदिया हा एकमेव जिल्हा आहे. सेंद्रिय शेतीमधील उत्पादित सेंद्रिय तांदूळ शिजवून खाऊ घालणे हा कार्यक्रम तालुका व जिल्हास्तरावर राबविण्यात येत आहे. आतापर्यंतच्या कार्यक्र मात जवळपास दीड हजारावर लोकांनी सेंद्रिय तांदळाचा आस्वाद घेतला आहे.
२ हजार ३७२ शेतकरी वळले सेंद्रिय शेतीकडे
जिल्ह्यातील २ हजार ३७२ शेतकरी ५१ गटामार्फत सेंद्रीय शेतीमधून तांदूळ उत्पादित करीत आहेत. परंतु यावर्षी कमी पावसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जवळपास ११ हजार ६६० क्विंटल सेंद्रिय तांदळाचे उत्पादन होऊ शकते. यामधून जवळपास ७ हजार ११६ क्विंटल तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.