शेतकऱ्यांनी जपली धान शेतीची परंपरा; यंदाही बम्पर लागवड
By कपिल केकत | Published: August 21, 2023 05:59 PM2023-08-21T17:59:33+5:302023-08-21T18:00:09+5:30
१०३ टक्के रोवणी आटोपली
गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान हेच प्रमुख पीक असून, यामुळेच जिल्ह्यात सर्वाधिक लागवड धानाचीच केली जाते. यंदाही शेतकऱ्यांनी त्यांची धान शेतीची परंपरा जपली असून, सोमवारपर्यंतच्या (दि.१४) आकडेवारीनुसार जिल्ह्यात १०३ टक्के रोवणी आटोपली आहे. यामध्ये आणखी वाढ होणार असल्याची शक्यता आहे. यावरून मात्र पावसाने साथ दिली तर यंदाही जिल्ह्यात धानाचे बंपर उत्पादन होणार, यात शंका नाही.
जिल्ह्याची ‘धानाचे कोठार’ म्हणून देश-विदेशात ओळख आहे. जिल्ह्यातील देशातील कोनाकोपऱ्यातच नव्हे, तर विदेशातही मोठ्या प्रमाणात पाठविला जातो, हे येथील धानाचे वैशिष्ट आहे. जिल्ह्याला मिळालेल्या या उपाधीनुसारच येथील शेतकरी धान शेतीला प्राधान्य देत असून, सर्वाधिक शेतकरी फक्त धानाचीच लागवड करतात. हेच कारण आहे की, अन्य पिकांची जेथे अत्यल्प लागवड केली जाते. तेथेच सर्वाधिक एक लाख ८० हजारांहून अधिक क्षेत्रात धानाची लागवड येथील शेतकरी करतो. विशेष म्हणजे, खरिपासोबतच रब्बी हंगामही शेतकरी धानानेच गाजवतो.
यंदा पावसाने सुरुवातील दगा दिल्याने शेतीच्या कामांना उशीर झाला. मात्र, जुलै व आता ऑगस्ट महिन्यात पाऊस साथ देत असल्यामुळे रेंगाळलेली कामे रुळावर आली आहेत. यातूनच यंदा शेतकऱ्यांनी एक लाख ८७ हजार ४८२.४८ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी केली असून, त्याची टक्केवारी १०३ एवढी होत आहे. म्हणजेच, सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला पावसाने दगा दिला. मात्र, आता जर पावसाची साथ मिळाली तर धानाचे उत्पादनही बंपर होणार, यात शंका नाही.
शेतकऱ्यांचा रोवणीवरच जास्त भर
- जिल्ह्यात धान पिकाची लागवड रोवणी व आवत्या या प्रकारांतून केली जाते. यानुसार यंदा १८ हजार ५०९.४० हेक्टर क्षेत्रात नर्सरी लावण्यात आली असून, त्यानंतर एक लाख ८१ हजार ५९ हेक्टर क्षेत्रात रोवणी करण्यात आली आहे. तर सहा हजार ४२३.४० हेक्टर क्षेत्रात आवत्या टाकण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे एकूण एक लाख ८७ हजार ४८२.४८ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी आटोपली आहे. यंदा धानाचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ८० हजार ९९७.३० हेक्टर होते. मात्र, तब्बल एक लाख ८७ हजार ४८२.४८ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी करण्यात आली असून, त्याची टक्केवारी १०३.५८ एवढी आहे.
गोंदिया तालुका माघारला
- कृषी विभागाने ठरविलेल्या सर्वसाधारण क्षेत्राच्या पलीकडे जावून जिल्ह्यातील शेतकरी धानाची लागवड करीत असल्यामुळे लागवड क्षेत्रात वाढ होत असून, रोवणीची टक्केवारी १०३ वर पोहोचली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत तरी फक्त गोंदिया तालुक्यातच सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रात धानाची रोवणी करण्यात आली आहे. गोंदिया तालुक्यात ३६ हजार ८७९.८६ एवढे सर्वसाधारण क्षेत्र असून, ३५ हजार ७७३.४६ हेक्टरमध्ये रोवणी आटोपली आहे. अन्य सातही तालुक्यांत मात्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात लागवड असून, रोवणीही आटोपली आहे.
एकूण भात नर्सरी- १८,५०९.४० हे.
- रोवणी : १,८१,०५९.०८ हे.
- आवत्या- ६४२३.४० हे.
तालुकानिहाय आटोपलेली रोवणी व आवत्या
तालुका- रोवणी- आवत्या
गोंदिया - ३४,६९३.४६- १०८०
गोरेगाव- २१,३६६-२९४
तिरोडा- २८,८९३- ७३०
अर्जुनी-मोरगाव- २२,७७९- २८७.२०
देवरी- १९४१२- ३२५१
आमगाव- १९,९२२-२३२.२०
सालेकसा- १५,६४३.६२- ३१०
सडक-अर्जुनी- १८,३५०-२३९