शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:16+5:302021-06-29T04:20:16+5:30

बोंडगावदेवी : वाढती महागाई पाहता शेती करताना विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. भातशेती करताना वारेमाप खर्चाला आळा बसण्यासाठी शेतकरी ...

Farmers should have access to modern technology | शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी

Next

बोंडगावदेवी : वाढती महागाई पाहता शेती करताना विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. भातशेती करताना वारेमाप खर्चाला आळा बसण्यासाठी शेतकरी बांधवांनी कमीत कमी खर्चाचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. उत्पादनाचा वाढता खर्च कमी करून पिकाचे उत्पादन घेण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरावी, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांनी केले.

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कृषी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिमा बोरकर होत्या. याप्रसंगी कृषीविषयक मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार, मंडळ कृषी अधिकारी वरखडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, कृषी पर्यवेक्षक कठाणे उपस्थित होते. या वेळी उपसरपंच भाग्यवान फुल्लुके, ग्रामविस्तार अधिकारी पी.एम. समरीत, तालुकास्तरीय कृषी समिती सदस्य रवी बनपूरकर, अमरचंद ठवरे, कृषी साहाय्यक खोटेले उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना रवींद्र लांजेवार म्हणाले, खरीप हंगामाला सुरुवात झाली. समस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती व्हावी. पीक उत्पादनवाढ आधुनिक तंत्रज्ञानाची इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवावी हा हेतू ठेवून कृषी संजीवनी मोहीम १ जुलैपर्यंत सर्वत्र राबविण्यात येत आहे. आजची पारंपरिक शेती आवाक्याबाहेर गेली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भात पिकाची नर्सरी लावणे गरजेचे असल्याचे सांगून कमी खर्चाच्या सुधारित तंत्रज्ञानाची चारसूत्री, सगुना पट्टा, श्री पद्धतीने भात पिकाची लागवड फायदेशीर असल्याचे सांगितले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी संत सावता माळी रयत बाजाराविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार कृषी सहायक खोटेले यांनी केले. कार्यक्रमाला गावातील शेतकरी, बचतगटाच्या महिला शेतकरी उपस्थित होते.

..................

Web Title: Farmers should have access to modern technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.