देशासाठी शेतकरी जगला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2017 01:27 AM2017-07-03T01:27:59+5:302017-07-03T01:27:59+5:30

शेतकरी जगला तर देश जगेल, या भावनेतूनच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी काम केले. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले.

Farmers should live for the country | देशासाठी शेतकरी जगला पाहिजे

देशासाठी शेतकरी जगला पाहिजे

Next

राजकुमार बडोले : जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी दिन साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकरी जगला तर देश जगेल, या भावनेतूनच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी काम केले. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. ते खऱ्या अर्थाने शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी कृषी विद्यापीठाची स्थापना केली. अनेक योजना राबविल्या. कृषी क्षेत्रात झालेली क्रांती ही वसंतराव नाईकांमुळेच आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे होत्या. अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी. कटरे, गोंदिया पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, प्रगतीशील शेतकरी रेखलाल टेंभरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, देशाच्या संदर्भात विचार केल्यास मागील दोन वर्षात कृषी क्षेत्रातील उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. स्वामीनाथन आणि वर्गीस कुरियन यांनी केलेल्या संशोधनामुळे कृषी व दुग्ध क्षेत्रात मोठी क्र ांती झाली आहे. शेती, पाणी व उत्पादित मालाची योग्य बांधणी न केल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. धानाची उत्पादकता वाढली पाहिजे यासाठी चांगले बीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत. सेंद्रीय धान उत्पादनाची चळवळ जिल्ह्यात उभी राहिल्यास आपण भक्कमपणे सेंद्रीय धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र व राज्य शासनाच्या कृषी संबंधित अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. जिल्ह्यात वन व पाणी मुबलक असताना आपण मानव विकास निर्देशांकात कमी आहोत. येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील एक हजार तलावातील गाळ काढून त्यांची सिंचन क्षमता वाढविण्यात येईल. शेतकऱ्यांनी मत्स्य, दूध, फळ व भाजीपाला पिकांकडे वळावे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. रोजगार हमी योजनेतून पांदन रस्त्यांची कामे घेण्यात यावी, त्यामुळे शेतातील उत्पादित माल शेतकऱ्यांना बाजारपेठेत पोहोचविणे सहज शक्य होईल.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, दुष्काळातून हरितक्रांतीकडे नेण्यास वसंतराव नाईक यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. देश आज महासत्तेकडे वाटचाल करीत असताना शेतीचा पाया भक्कम असणे गरजेचे आहे. आज शेतीचा खर्च वाढला असून उत्पन्न कमी होत आहे. सेंद्रीय शेतीची चळवळ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने सेंद्रीय पध्दतीने धानपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना भरीव मदत करणे गरजेचे आहे.
जि.प. उपाध्यक्ष गहाणे म्हणाल्या, कृषी विकासाच्या दृष्टीने नियोजनाचा अभाव आहे. जिल्ह्यात सिंचनाच्या दृष्टीने येत्या तीन वर्षात तलावांचे खोलीकरण व कालव्यांची दुरूस्ती होणार असल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढेल. शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या योजना पोहोचविण्याचे काम संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी आत्माचे संचालक हिंदूराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, आत्माचे उपसंचालक सराफ, कृषी अधिकारी निमजे, कृषी विभागाचे अधिकारी- कर्मचारी व जिल्ह्यातून आलेले शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी केले. आभार कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे यांनी मानले.

तांत्रिक पद्धतीने शेती करां
शेतकऱ्यांनी तांत्रिक पध्दतीने शेती करावी, यासाठी अनेक योजना आहेत. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असताना आपण उत्पादनात मागे आहोत. शेतकऱ्यांनी आता शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, मत्स्यपालन व दुग्धव्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाने योजनांची माहिती प्रभाविपणे पोहोचवावी. त्यामुळे त्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे होईल असे, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे म्हणाल्या.

Web Title: Farmers should live for the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.