शेतकरी वळले सौरपंप संयंत्राकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:24 AM2021-07-25T04:24:33+5:302021-07-25T04:24:33+5:30
नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्यावर गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेसे नाले खोदले नाहीत. जेथे खोदले तेथील ...
नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्यावर
गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेसे नाले खोदले नाहीत. जेथे खोदले तेथील नालेही नागरिकांनी बुजवून टाकले आहेत. यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे.
महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव : गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र, आता अनुदान जमा झालेले नाही.
ग्रामीण भागात माकडांचा आतंक
पांढरी : सध्या सगळीकडे शेतीची कामे सुरू आहेत. शेतात नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे माकडांनी गावाकडे धाव घेतली आहे. माकडे गावात येऊन घर व भाजीपाल्याचे नुकसान करतात.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
सालेकसा : अनेक ठिकाणी वीजकंपनीचे डीपी खुल्या अवस्थेत आहेत. या उघड्या डीपींमधूनच वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे मोठ्या धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोकाट जनावरांचा मुख्य रस्त्यावर बैठा सत्याग्रह
बोंडगावदेवी : तालुक्याचे मुख्य ठिकाण, व्यापार नगरी असलेल्या अर्जुनी मोरगाव शहराच्या रहदारीच्या मार्गावर सद्यस्थितीत मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. मात्र, याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अर्जुनी मोरगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने लोकांची सतत वर्दळ असते.
बेरोजगारांच्या हाताला काम द्या
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून, स्थानिक युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र, धानावर आधारित उद्योग नसल्याने युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बेरोजगारांनी काम मिळवून देण्याची मागणी केली जात आहे.
बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी
केशोरी : येथील बसस्थानक परिसरातील जागेत खासगी व्यावसायिकांनी दुकाने थाटून शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे परिवहन मंडळाची बस परत फिरविण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी होत आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासन दुकानदारांचे हित जोपासून अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.
अर्धवट बांधकामाचा बसतोय फटका
गोरेगाव : गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर फाटक नसलेल्या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच अपुऱ्या मनुष्यबळाअभावी रेल्वेमार्गावर फाटक उभारण्यास अडचणी निर्माण होत असल्याने रेल्वे विभागाकडून मागील १० ते १५ वर्षांपासून अनेक रेल्वे मार्गांवर बोगद्यांचे काम सुरू आहे; पण हे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
सालेकसा : तालुक्यातील काही गावात व्यायामशाळा नसल्याने युवकांची अडचण होत आहे. स्वस्थ शरीरासाठी व्यायाम महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.