शेतकऱ्यांचे वेट अॅन्ड वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 10:44 PM2018-07-09T22:44:54+5:302018-07-09T22:45:15+5:30
अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. याला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. मात्र यानंतरही कर्जमाफीचा घोळ संपला नसून जिल्ह्यातील २० हजारावर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.जुने कर्जमाफ झाले नसल्याने नवीन पीक कर्जाची उचल करता येत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
वर्षभरापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील १ लाख २० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यानंतर या अर्जांची पडताळणी करुन ८२ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी दिलेली माहिती आणि बँकांनी दिलेली माहिती न जुडल्याने आॅनलाईन अर्जाची छाननी करुन त्याची ग्रीन, येलो आणि रेड अशा तीन याद्या तयार केल्या. त्यानंतर टप्प्या टप्याने या याद्या जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाकडे पाठविल्या. आतापर्यंत बँकाना एकूण ८ याद्या प्राप्त झाल्या असून जिल्हा बँकेने एकूण ५२ हजार ६८८ शेतकºयांचे १४० कोटी ५४ लाख रुपयांचे कर्जमाफ केले आहे.
राष्ट्रीयकृत बँकांनी ७ हजार ८८५ शेतकºयांचे ३५ कोटी ८० लाख आणि ग्रामीण बँकानी ३ हजार ८९४ शेतकऱ्यांचे ११ कोटी ८७ लाख रुपयांचे कर्जमाफ केले आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या आकडेवारी नजर टाकल्यास २० हजारावर शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित असल्याचे चित्र आहे.
आधी जुने भरा नंतर नवीन मिळेल
जे शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले त्यापैकी २० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. ही रक्कम जर आता शेतकऱ्यांनी भरली तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तर बँकेच्या नियमानुसार जोपर्यंत शेतकऱ्यांचे जुने कर्ज फेडले जात नाही तोपर्यंत नवीन पीककर्ज त्याला देता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
हंगाम येणार अडचणीत
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यातच सरकार कर्जमाफीच्या धोरणात रोज नवीन बदल करीत आहेत. तर दुसरीकडे अजूनही कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे शेतकºयांचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे.
ग्रीन लिस्ट पाठवण्यिास विलंब
कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. त्या अर्जातील माहिती व बँकांनी दिलेली माहिती याची चाचपणी केली जात आहे. यानंतर माहिती जुडलेले अर्जांचा समावेश ग्रीन यादीत करुन ती यादी बँकाना पाठविली जाते. त्यानंतर बँका शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करतात. मात्र मागील तीन महिन्यापासून शासनाकडून ग्रीन याद्या पाठविण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे बँकांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.