शेतकऱ्यांना सातबारा प्रत घरपोच मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:00+5:302021-09-14T04:34:00+5:30
केशोरी : भारत हा कृषी प्रधान देश असून, देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये शेती क्षेत्राचा फार मोठा वाटा राहिलेला ...
केशोरी : भारत हा कृषी प्रधान देश असून, देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये शेती क्षेत्राचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वराज्य संकल्पनेनुसार शेती ही सर्व विकासाची आधारशिला आहे. त्यामुळे येणाऱ्या गांधी जयंती २ ऑक्टोबरपासून प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा उताऱ्याची प्रत गावातील तलाठ्यामार्फत देण्याचा उपक्रम शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत राबविण्यात येणार असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा उताऱ्याची अद्ययावत प्रत शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मोफत वितरण करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून देशाच्या व राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये शेती क्षेत्राचा मोठा वाटा राहिला आहे. तसेच महात्मा गांधी यांच्या स्वराज्य संकल्पनेतून म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्य यामध्ये शेती ही सर्व विकासाची आधारशिला होती. या संदर्भाधीन शासन निर्णयान्वये महसूल लेखांकन पद्धतीविषयक ७/१२ अधिकार अभिलेख पत्रक अद्ययावत करण्यात आले आहे. चालू वर्ष २०२१-२२ हे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून डिजिटल भूमिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ई-महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या सातबारा उताऱ्याची प्रत गावातील तलाठ्यामार्फत प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन मोफत वितरण करण्याचा उपक्रम राबविण्याची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. ही योजना महात्मा गांधी जयंतीपासून राबविण्यात येणार असून, याचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार आहे हे निश्चित.