फार्महाऊसला लागलेल्या आगीमुळे कृषी साहित्य जळून राख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:30 AM2021-04-04T04:30:22+5:302021-04-04T04:30:22+5:30
आमगाव : वनव्यामुळे फार्महाऊसला लागलेल्या आगीत कृषी साहित्य, चंदनाची झाडे आणि शेतमाल जळून राख झाल्याची घटना शनिवारी (दि. २) ...
आमगाव : वनव्यामुळे फार्महाऊसला लागलेल्या आगीत कृषी साहित्य, चंदनाची झाडे आणि शेतमाल जळून राख झाल्याची घटना शनिवारी (दि. २) दुपारी दोन वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोरकन्हार येथे घडली. या आगीमुळे अनिकेत कटरे यांचे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
बोरकन्हार येथील रहिवासी अनिकेतसिंग लखनसिंग कटरे यांच्या घरापासून काही अंतरावरच जवळपास तीन-चार एकरमध्ये फार्महाऊस आहे. यात त्यांनी चंदन वृक्ष व शेतमालाची लागवड केली आहे. शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या शेतात अचानक आग लागली. या आगीत कृषी साहित्य, पाणी टाकी, ड्रिपचे पाईप, चंदनाचे वृक्ष, शेतमाल, जनावरांचा चारा, आदी जळून राख झाले. प्राप्त माहितीनुसार कटरे यांच्या शेताला लागूनच जंगल आहे. दरम्यान, जंगलात लागलेली आग पसरत पसरत कटरे यांच्या फार्महाऊसपर्यंत पोहोचली. यामुळेच कटरे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वन विभागाने जंगल परिसरातील आग विझविली; पण कटरे यांच्या शेतातील आग विझविण्यासाठी कुठलेच सहकार्य केले नसल्याचा आरोप कटरे यांनी केला आहे. या घटनेला वन विभागाचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असून, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी अनिकेतसिंग कटरे यांनी केली आहे. फार्महाऊसला लागलेल्या आगीमुळे कटरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी कटरे यांनी केली आहे.