खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीची कामे जोरात सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:41+5:302021-05-30T04:23:41+5:30
केशोरी : रब्बी धान पिकाचा हंगाम आटोपताच पावसाळा काही दिवसांच्या अंतरावर येवून ठेपला आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी मशागतीच्या कामाला ...
केशोरी : रब्बी धान पिकाचा हंगाम आटोपताच पावसाळा काही दिवसांच्या अंतरावर येवून ठेपला आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी मशागतीच्या कामाला लागला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खतांच्या वाढलेल्या किंमती लक्षात घेता कोंबड्यांचे चिचडी खत शेतीत टाकण्याचा विचार करताना शेतकरी दिसून येत आहेत.
गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर ही चारही जिल्हे भात शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. उन्हाळी धान पीकांचा हंगाम आटोपताच शेतीत शेणखत टाकणे, बांध्या सपाट करणे, कचरा पेटविणे, नांगरणी, वखारणी आणि धुरे निटनेटके करण्याच्या कामात शेतकरी दिसून येत आहे. यावर्षी खताच्या किंमतीत भरमसाट झालेली वाढ लक्षात घेता शेतकरी शेणखताकडे वळण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. परंतु जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे शेणखत पाहिजे त्या प्रमाणात मिळणे कठिण आहे. ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची कामे करीत असल्याने बैलजोड्या कमी झाल्या आहेत.
परिणामी शेणखत मिळणे कठिण झाले आहे. नाईलाजास्तव रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. काही शेतकऱ्यांकडे शेणखत उपलब्ध असून त्यांचे शेखणत टाकणे सुरु आहे. यावर्षी कोरोना महामारीने मागील वर्षापेक्षा शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ढासळली असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे घेण्यासााठी पैशांची जुळवाजुळव करणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात मंजूर बोनसची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. किमान कृषी विभागाने धानाचे बी-बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. अशात आता रासायनिक खतांऐवजी कोंबड्याच्या चिचडी खताकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.