दारूबंदीसाठी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 09:42 PM2019-01-21T21:42:13+5:302019-01-21T21:42:28+5:30
शहराच्या छोटा गोंदिया वॉर्ड क्र.२ परिसरात वैध, अवैध देशी दारू दुकान, बिअर बार, गल्लोगल्लीत सुरू असलेले कॅसिनो क्लब, जुगार क्लब, कॅरम क्लब, लॉटरी व्यवसाय, गांजा विक्री व सट्टा जोमात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराच्या छोटा गोंदिया वॉर्ड क्र.२ परिसरात वैध, अवैध देशी दारू दुकान, बिअर बार, गल्लोगल्लीत सुरू असलेले कॅसिनो क्लब, जुगार क्लब, कॅरम क्लब, लॉटरी व्यवसाय, गांजा विक्री व सट्टा जोमात आहे. त्यामुळे समाजस्वास्थ धोक्यात आले आहे. तरूणपिढी व्यसनाच्या व वाम मार्गाच्या गर्ततेत जात असल्याने हे अवैध धंदे व दारू दुकाने बंद करण्यात यावे, या मागणीला घेऊन छोटा गोंदियातील महिलांनी आजपासून (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
छोटा गोंदियात सुरू असलेली दारू दुकान, बिअरबार बंद करण्यात यावे, अशी मागणी महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडे केली होती.
संपूर्ण दारूबंदीसाठी ११९४ महिलांपैकी ९४९ महिला दारूबंदीसाठी पुढे आल्या होत्या. हे प्रमाण २५ टक्के आहे. परंतु दारूबंदी समितीने केलेल्या मागणी अर्जाला चुकीचे दर्शवून राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूबंदीवर निवडणूक घेण्यास तयार नाही.
शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून महिलांची टक्केवारी २५ टक्यापेक्षा कमी दाखवित आहेत. राज्य उत्पादन शुल्क दारूविक्रेत्यांना पाठीशी घालत असल्यामुळे सोमवारपासून (दि.२१) छोटा गोंदियातील महिला व पुरूष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाला मिना रामटेके, सुनिता बारसागडे, बबीता उके, रंजना मेश्राम, सुजिता मेश्राम, लतीका गणवीर, सत्यज्वाला बागडे, पदमा गणवीर, रंजू गजभिये, कल्पना मेश्राम, रेखा रामटेके, करूणा उके, जयतुरा मेश्राम, पदमा रंगारी, मिनाक्षी गणवीर, नलू मेश्राम, राखी खोब्रागडे, संगीता उके, दीपमाला उके, गौतमा उके, सारीका मेश्राम, प्रतिमा सावनकर, मनू उके, मिमीका वैद्य, रेखा मेश्राम यांचा समावेश आहे.