हौसेला मोल नाही, पण येथे विकत मिळतोय मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 03:26 PM2023-06-26T15:26:29+5:302023-06-26T15:27:19+5:30
नवेगावबांधमध्ये मासेमारांच्या होडीतून जीवघेणे पर्यटन
संतोष बुकावन / रामदास बोरकर
नवेगावबांध (गोंदिया) : लाईफ जॅकेट, पर्यटकांचा विमा, प्रशिक्षित नौकाचालक नसतांनाही नवेगावबांध जलाशयात खुलेआम होडीतून जीवघेणे अवैध पर्यटन सुरू आहे. या प्रकारावरून पर्यटकांनी नौकाविहाराची हौस पुरविण्यासाठी स्वतःच पैसे खर्च करायचे व स्वतःचा मृत्यू ओढवून घ्यायचा असा प्रकार येथे सुरू आहे. चक्क समितीच्या एका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा जीवघेणा जलप्रवास सुरू होता, हे विशेष.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या वसाहत संकुल परिसरात विस्तीर्ण जलाशय आहे. रविवारी पर्यटकांची भरपूर संख्या होती. हा तलाव पाटबंधारे विभागाच्या देखरेखीत आहे. पाटबंधारे विभागाने संयुक्त वन व्यवस्थापन समितीला या तलावात नौकाविहाराची परवानगी दिली आहे. सहा महिन्यांत तीन ते चार ग्रामसभा झाल्यात. अद्याप नवीन समिती स्थापन झाली नाही. दुसरीकडे समितीचा कारभार ग्रामपंचायतीकडे आहे. समितीने पर्यटकांकडून पैसे घेऊन नौकाविहाराची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. पावसाळ्यात नौकाविहार बंद असते. या दृष्टीने शनिवारपासून नौकाविहार बंद करण्यात आल्याचे समजते. समिती नसताना नौकाविहार कुणाच्या आदेशाने बंद झाले हे कळायला मार्ग नाही.
या संधीचा फायदा घेत रविवारी तलावात मासेमारी करणाऱ्यांनी अनधिकृतपणे ही सूत्रे आपल्या हाती घेतली. नियम धाब्यावर बसवून मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या होडीतून पर्यटकांची हौस पुरविली जात होती. ज्या समितीकडे संकुल परिसर चालविण्याचे अधिकार आहेत. त्या समितीचे पाठबळ तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.पर्यटकांच्या जीविताशी खेळ केला जात असतांना मौन धारण का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पर्यटकांसह जीवघेणा खेळ
नौकाविहार करतांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काही नियम घालून देण्यात आले आहेत. या नियमांच्या अधीन राहूनच नौकाविहार करायची आहे. मात्र नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. नौकाविहार करणाऱ्यांना लाईफ जॅकेट, त्यांचा विमा, प्रशिक्षित नौकाचालक, प्रशिक्षित बचावदल, नौकेत निर्धारित पर्यटकांची संख्या, विभागाची परवानगी या सर्व बाबी आवश्यक आहेत. पर्यटकांच्या दृष्टीने सर्व नियम असले तरी ते पायदळी तुडवून हा जीवघेणा खेळ केला जात आहे.
वन विभागाही अनभिज्ञ
पर्यटकांना जिवाची भीती नाही व त्या मासेमारांनाही पर्यटकांची पर्वा नाही असा प्रकार येथे सुरू आहे. छोट्याशा होडीत तब्बल सहा ते सात पर्यटक होते. दिवसभर सतत दोन होडी चालविल्या जात होत्या. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यासंदर्भात वन परिक्षेत्राधिकारी अवगान यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता तीन-चार दिवसांपूर्वी प्रभार घेतला. याविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर सांगतो असे म्हणाले. ग्राम विकास अधिकारी रामटेके यांनी मी संयुक्त वन समितीचा पदाधिकारी नसल्याचे सांगितले.