अमानुष; जन्मदात्याने जमिनीवर आपटून केला बालिकेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 11:14 PM2020-12-21T23:14:12+5:302020-12-21T23:19:43+5:30
Gondia News crime तिला या जगात येऊन जेमतेम सव्वादोन महिने झाले होते. आपल्या जन्मदात्याला डोळे भरूनही तिने पाहिले नव्हते. तत्पूर्वी त्याच जन्मदात्याने त्या निष्पाप बालिकेला जमिनीवर आपटून या जगातून संपविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिला या जगात येऊन जेमतेम सव्वादोन महिने झाले होते. आपल्या जन्मदात्याला डोळे भरूनही तिने पाहिले नव्हते. तत्पूर्वी त्याच जन्मदात्याने त्या निष्पाप बालिकेला जमिनीवर आपटून या जगातून संपविले. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी तालुक्यातील खामखुरा या गावात घडली. मृतक बालिकेचे नाव नायरा भवेश राऊत असे आहे. आरोपीला अर्जुनी मोरगाव पोलिसांनी अटक केली आहे.
खामखुरा येथील निराशा हिचे भवेश राऊत ( करांडली ) याचेशी एक ते दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. भवेश हा मद्यपान करून तिला नेहमी मारहाण करायचा. तिच्या पोटात अंकुर वाढत असतांनाच या त्रासाला कंटाळून ती माहेरी खामखुरा येथे आली होती. ११ ऑक्टोबर रोजी तिने गोंडस बालिकेला जन्म दिला. त्याच्या मनात काय होते माहीत नाही. तो शुक्रवारी एका इसमासोबत दुचाकीने खामखुरा येथे आला. सासरच्या घराबाहेर दुचाकी उभी केली. सोबत असलेला इसम दुचाकीवरच स्वार होता. दुचाकी सुरुच होती. निराशा दरवाजात उभी होती. बालिका पाळण्यात झोपी गेली होती. निराशाला धक्के देत आरोपी भवेश घरात शिरला. त्याने पाळण्यातून बालिकेला बाहेर काढले व जमिनीवर जोरात आपटले. तिने आरडाओरड केली. तोपूर्वीच भवेश निघून गेला. बालिकेच्या कपाळ व डोक्याला जबर मार लागला होता. तिला अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तपासणीनंतर तिला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री साडेदहाच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. जन्मदाता आरोपी भवेश विरुद्ध अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात ३०२,३२३,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने बालिकेला नकोशी म्हणून की अन्य कारणांमुळे संपविले ते तपासात उघड होईल. सोमवारी (दि.२१)जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक महादेव तोदले पुढील तपास करीत आहेत.
तिचे स्वप्न अधांतरीच
लग्नानंतर तिने सुखी संसाराची अनेक स्वप्न बघितली होती. पहिल्या मातृत्वाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. बालिकाही जन्माला आली. पण पतीने तिच्या स्वप्नांचा चुराडा केला. निराशा अत्यंत निराश झाली. आमच्या प्रतिनिधीने भेट घेतली तेव्हा तिचे अश्रू अनावर झाले होते.