कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:30 AM2021-05-19T04:30:28+5:302021-05-19T04:30:28+5:30
गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन होता. उद्योगधंद्यासह मनरेगाची कामेसुद्धा बंद होती. संपूर्ण उन्हाळा ...
गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन होता. उद्योगधंद्यासह मनरेगाची कामेसुद्धा बंद होती. संपूर्ण उन्हाळा लॉकडाऊनमध्येच गेला, तर यंदाही तीच परिस्थिती आहे. मनरेगासह इतरही कामे बंद असल्याने मजुरांना रोजगारासाठी बाहेर उन्हात जाण्याची वेळ आली नाही, तर इतर नागरिकांच्या बाबतीत सुद्धा हीच वास्तविकता आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांत उष्माघाताने एकाचाही बळी गेला नाही. केवळ २०१९ मध्ये उष्माघाताने दोन जणांचा बळी गेल्याची नोंद आहे. एकंदरीत मागील वर्षी आणि यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही. कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाल्याचे चित्र आहे. मागील वर्षी मार्च ते जूनदरम्यान लॉकडाऊन होता. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. वाहतूक देखील ठप्प असल्याने प्रदूषणात घट होऊन तापमानात सुद्धा वाढ झाली नव्हती. त्यामुळेच उष्माघाताचे रुग्ण वाढले नाहीत. जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यात तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते, तर मे महिन्यात तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या आतच आहे. त्यामुळे यंदासुद्धा फारसा उन्हाळा जाणवला नाही.
............
ऊन वाढले तरी
यंदा एप्रिल महिन्यात जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे मे महिन्यात काय होणार, अशी चिंता जिल्हावासीयांना सतावत होती. कारण, या कालावधीत मनरेगाची कामे, तेंदुपत्ता व मोहफुल वेचण्याचा हंगाम असतो. यासाठी ग्रामीण भागातील मजूरवर्ग रोजगारासाठी बाहेर जात असतो. दिवसभर ऊन अंगावर घेऊन काम करतो. मात्र, यंदा एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने ही सर्व कामे बंद असल्याने वाढत्या तापमानाचा फारसा परिणाम झाला नाही, तर उष्माघाताने एकही बळी गेला नाही.
..........
कोरोनामुळे उन्हाळा घरातच
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत मागील महिनाभरापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योगधंदे व सर्वच व्यवहार ठप्प आहेत, तर नागरिकांना बाहेर फिरण्यास निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाचा उन्हाळा देखील जिल्हावासीयांना घरात घालवावा लागला आहे. त्यामुळे ना उन्हाची समस्या व उष्माघाताचा त्रास झाला नाही. यंदा अवकाळी पाऊस अधून-मधून हजेरी लावत असल्याने मे महिन्यातसुद्धा तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खालीच होते. अवकाळी पावसामुळे उकाड्याचा त्रास थोड्या प्रमाणात सहन करावा लागला.
...............
तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी
सन २०१९-२
सन २०२०-०
सन २०२१-०
...................
काेट
मागील वर्षी मार्चपासून काेरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा लॉकडाऊनमध्येच गेला, तर यंदासुद्धा तीच स्थिती आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन मनरेगासह इतर कामेसुद्धा बंद आहेत. शेतकरी वर्गसुद्धा सकाळच्या सुमारास शेतीची कामे करून घेत आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षांत उष्माघाताने एकही बळी गेलेला नाही.
- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी.