झाटीपट्टीतील नाटक, तमाशा, दंडार, मंडईवर कोरोनाचे नवे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 05:34 PM2021-12-02T17:34:32+5:302021-12-02T17:39:11+5:30
अलीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होताच या परिसरात नाटक, तमाशा, हंगाम यांसारख्या मनोरंजनातून कार्यक्रम करण्यास शासनाने मंजुरी देणे सुरू होते. परंतु, नव्या संकटामुळे मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यावर बंदी येणार अशी भीती निर्माण झाली आहे.
गोंदिया : दिवाळी सण संपताच या परिसरात झाडीपट्टी रंगभूमी अंतर्गत स्थानिक कलाकारांच्या समन्वयातून गावागावांत मंडई उत्सवाला सुरुवात केली जाते. या निमित्ताने नाटक, तमाशा, हंगाम अशी विविध मनोरंजनाची कार्यक्रम आयोजित केली जातात. मागील गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती.
अलीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होताच या परिसरात नाटक, तमाशा, हंगाम यांसारख्या मनोरंजनातून कार्यक्रम करण्यास शासनाने मंजुरी देणे सुरू होते. त्यामुळे प्रत्येक गावातून कार्यक्रमाची रेलचेल दिसून येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या संकटामुळे मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यावर बंदी येणार अशी भीती निर्माण झाली आहे. यामुळे कलाकारांच्या रोजगारावर पाणी फिरणार हे निश्चित.
दिवाळीनंतर या भागात दरवर्षी मंडई उत्सवानिमित्ताने नाटक, तमाशा, दंडार, हंगामा यांसारखी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असते. कोरोनाच्या महामारीने गेल्या दोन वर्षांपासून या कार्यक्रमांवर शासनाने बंदी घातली होती. कोरोनाचा संसर्ग कमी होताच झाडीपट्टी रंगभूमी पूर्ण ताकदीसह गावागावांत कार्यक्रम करण्यास सज्ज झाली होती. अनेक गावातून कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आली. परंतु अलीकडे ओमायक्रॉन या नव्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासन पुन्हा कार्यक्रम करण्यावर बंदी घालण्याच्या शक्यतेमुळे नाटक, तमाशा, हंगामा, दंडार आदी समाज प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमामधून कलाकौशल्य सादर करणाऱ्या हजारो कलाकारांवर उपासमारीचे संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे.