तिसऱ्या लाटेच्या भीतीने लग्न सोहळ्यांचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:35 AM2021-07-07T04:35:29+5:302021-07-07T04:35:29+5:30
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशात ठरवून असलेले विवाह ...
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशात ठरवून असलेले विवाह सोहळे आता त्यापूर्वी आटोपून घेण्यासाठी वर-वधू पित्यांची धावपळ सुरू झाली आहे; मात्र शासनाने विवाह सोहळ्यांसाठी परवानगी बंधनकारक केली आहे. त्यामुळे लग्नाची कामे सोडून वर-वधू पित्यांना परवानगीसाठी शासकीय कार्यालयाची ये-जा करावी लागत आहे. शिवाय, ५० वऱ्हाडींच्या अटींचे पालन करणे गरजेचे असताना याला तिलांजली देत विवाह सोहळे त्याच थाटामाटात आटोपले जात आहेत; मात्र तिसऱ्या लाटेच्या भीतीने विवाह सोहळ्यांचा एकच धडाका दिसून येत आहे.
------------------------------
या असतील अटी...
आजघडीला विवाह सोहळा आटोपण्यासाठी सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच विवाह करता येणार आहे. तसेच दोन्ही पक्षाकडील ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. याशिवाय ज्या सभागृहात-लॉनमध्ये विवाह सोहळा आटोपला जाणार आहे त्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
-----------------------
परवानगीसाठी धावपळ
विवाह सोहळा आटोपण्यासाठी कित्येकांची तयारी आहे मात्र परवानगीसाठी धावपळ करावी लागत आहे. परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय अथवा तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा लागत आहे. अर्जासोबत वधू-वराचे आधारकार्ड, त्यांचे फोटो, लग्नाची पत्रिका, ज्या सभागृहात विवाह होणार आहे त्याचे परवानगी पत्र द्यावे लागते. तसेच याच अर्जाची एक प्रत पोलीस ठाण्यात द्यावी लागते. विशेष म्हणजे, सभागृहाचे सॅनिटायजेशन व मास्कचा वापर अनिवार्य असून या गोष्टींची काळजी वधू पक्षाला घ्यावी लागते.
------------------------------
घरी असलेल्या विवाह सोहळ्यासाठी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. २ दिवसांत परवानगी मिळाली व ते पत्र सभागृहाला दिले. त्यानंतर शारीरिक अंतराचे पालन, मास्कचा वापर व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नियमांचे पूर्णपणे पालन करून विवाह सोहळा आटोपला.
- सुनील धवने, गोंदिया
--------------------------
माझ्या मुलाचा विवाह सोहळा होता व त्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून सर्व प्रक्रिया केली. परवानगी घेऊन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे, मास्कचा वापर व शारीरिक अंतराचे पालन करणे आपल्या सुरक्षेसाठी गरजेचे आहे व ते प्रत्येकाने करावे.
- विजय बिलोना, गोंदिया
--------------------------
शुभमुहूर्त
आज समाज कितीही मॉडर्न झाला असला तरीही प्रत्येकच धर्म व जातीत विवाह सोहळ्यात पारंपरिक काही नियमांचे पालन केले जातेच. यात विवाह सोहळ्यांसाठी शुभमुहूर्त बघितलाच जातो. हिंदू धर्मात पंडितांकडून शुभदिवस व वेळ बघूनच विवाह ठरविले जातात. यंदा जुलै महिन्यात ७, ८, १२, १३, १४ व १५ या तारखा विवाहासाठी शुभ असल्याचे पंडित गोविंद शर्मा यांनी सांगितले. जोडप्याच्या भावी सुखी संसारासाठी आजही प्रत्येकच घरात विवाहाचा शुभमुहूर्त बघितला जातोच.