‘मिशन शौर्य’साठी ‘सीईओं’चा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:42 PM2018-06-08T23:42:04+5:302018-06-08T23:42:04+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून ‘मिशन शौर्य’ अंतर्गत १० विद्यार्थ्यांना माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रोत्साहित करणारे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून ‘मिशन शौर्य’ अंतर्गत १० विद्यार्थ्यांना माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रोत्साहित करणारे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी यांचा शुक्रवारी (दि.८) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी जि.प. गोंदियाचे सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, शैलजा सोनवाने, विश्वजित डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. गावडे, माजी अध्यक्ष उषा मेंढे, माजी उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी सभापती पी.जी. कटरे, छाया दसरे, विमल नागपुरे, जि.प. चे ज्येष्ठ सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सुद्धा डॉ. राजा दयानिधी यांचे पुष्पगुच्छ देवून कौतुक केले. चंद्रपूर येथे आदिवासी विकास विभागात परिविक्षाधिन प्रकल्प अधिकारी म्हणून डॉ. राजा दयानिधी कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी ‘मिशन शौर्य’ हा उपक्रम राबविला. त्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत प्रशिक्षणासाठी ५० आदिवासी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. १० विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करण्यास सुरूवात केली. त्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात माऊंट एव्हरेस्ट सर केले.
विशेष म्हणजे, यात एका आदिवासी विद्यार्थिनीचा देखील समावेश आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तथा महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा लौकीक वाढविण्यासाठी डॉ. राजा दयानिधी यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सत्कार केला. गोंदिया जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे कौतुक केले.