लग्न माेडल्यामुळेच महिला डॉक्टरने केली आत्महत्या; चौघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 05:55 PM2022-03-07T17:55:10+5:302022-03-07T18:04:40+5:30
मुलाकडून ३ मार्च रोजी लग्न मोडण्यात आल्याचे डाॅ. नेहाच्या कानावर पडले व तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम सेजगाव येथील महिला डॉ. नेहा हेमराज पारधी (३०) हिने शुक्रवारी (दि.४) गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. असे असतानाच लग्न मोडल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात लग्न मोडणाऱ्या उपवरासह चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. नेहा पारधी तिरोडा येथील शहीद मिश्रा वॉर्ड येथे भाड्याच्या खोलीत राहून आपले क्लिनिक चालवित होती. पारंपरिक पद्धतीने तिचा सारखपुडा १२ ङिसेंबर २०२१ रोजी बालाघाट येथील मनीष चुन्नीलाल टेंभरे (३०) याच्यासोबत करण्यात आला होता. साखरपुड्यानंतर दोघांचे एकमेकांशी बोलणे सुरू होते. सुरुवातीला एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून ते बाेलायला लागले. मात्र बोलता-बोलता त्या दोघांचे खटके उडू लागले होते. यात मनीषचा भाऊ आणि बहिणीही नाक खुपसत होत्या. त्यामुळे त्या दोघांमधील वाद आणखी वाढत गेले. अशातच मुलाकडून ३ मार्च रोजी लग्न मोडण्यात आल्याचे डाॅ. नेहाच्या कानावर पडले व तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेसंदर्भात डॉ. नेहाची बहीण प्रियंका बेनिराम धारंगे (३७) यांनी तिरोडा पोलिसात तक्रार केली असता आरोपी मनीष चुन्नीलाल टेंभरे (३०), मोहित चुन्नीलाल टेंभरे (२८), राणी चुन्नीलाल टेंभरे (४०), रितू चुन्नीलाल टेंभरे (३३, सर्व रा. बालाघाट) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते करीत आहेत.
खोलीत आढळले सुसाईड नोट
डॉ. नेहा पारधी हिने तिरोडा येथील भाड्याच्या खोलीत आत्महत्या करण्यामागील कारण सुसाईड नोटवर लिहून ठेवले होते. लग्न मोडल्यामुळेच धसका घेऊन आत्महत्या करीत असल्याचे त्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
क्षुल्लक कारणातून वाढला वाद
लग्न जुळल्यावर डॉ. नेहा व मनीष बोलत असताना त्यांच्यात क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून वाद होऊ लागले. लग्नानंतर ६ महिने तिरोडा येथे राहून मी प्रॅक्टिस करेल, असे डॉ. नेहाचे म्हणणे होते. तर मनीष तिला लग्न झाल्याबरोबर बालाघाटला येण्यास सांगत होता. डॉ. नेहा यांना लग्नानंतर केस कापता येणार नाही, केस वाढवावे लागतील असे मनीषच्या बहिणी म्हणत असल्याने यातून त्यांचा वाद झाल्याची माहिती आहे.