स्त्री शक्ती तुझी ही कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:42 AM2018-03-08T00:42:16+5:302018-03-08T00:42:16+5:30
आठ मार्च, जागतिक महिला दिन. महिला सशक्तीकरण दिवस, महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ संबंध जगात साजरा केला जाणारा हा दिवस.
संतोष बुकावन/रामदास बोरकर ।
ऑनलाईन लोकमत
अर्जुनी मोरगाव : आठ मार्च, जागतिक महिला दिन. महिला सशक्तीकरण दिवस, महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ संबंध जगात साजरा केला जाणारा हा दिवस. महिलांनी आपले होणारे शोषण व अन्यायाविरुद्ध संघटितपणे आवाज उठविला. सामूदायिकरीत्या रस्त्यावर उतरुन आपला आवाज बुलंद केला. यामुळेच त्यांच्यात आत्मविश्वास जागृत झाला. शतकानुशतके चालत आलेल्या पुरुषकेंद्री व्यवस्थेमध्ये कोंडीत सापडलेल्या महिलांनी आता कुठे का ही प्रमाणात मोकळा श्वास घेतला. आज अनेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला पुढे येऊ लागल्या आहेत. तरीही महिला दिन साजरा करीत असाताना आजही स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने मानसन्मान मिळतो काय? स्त्री-पुरुष समानता आहे काय? हे प्रश्न कायम आहेत.
भारतीय संस्कृतीत नवºयाला बायकोच्या कुंकवाचा धनी संबोधले जाते. ज्या धन्याच्या भरवशावर कुटुंबाचा गाडा चालतो त्याचा जर दुदैवी मृत्यू झाला तर त्या कुटुंबावर दु:खाचे कसे डोंगर कोसळते व ते पेलवत असताना किती हालअपेष्ठांना सामोरे जावे लागते हे त्यांनाच ठाऊक असते. नवेगावबांधच्या पात्रे कुटुंबातील तीन भावंड एकापाठोपाठ स्वर्गवासी झाले. तीन महिला विधवा झाल्या. मात्र त्यांनी धीर सोडला नाही. संयम व सन्मानाने संघटितपणे चरितार्थ चालविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सासू व तीन स्रूषा याच एकमेकांच्या आधार बनल्या. घरात अठराविश्वे दारिद्र्य असले तरी हालअपेष्ठांना सामोरे जात त्या गुण्यागोविंदाने व सन्मानाने जगत आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाला महिला दिनानिमित्त सलाम !
नवेगावबांध येथे पात्रे नावाचे कुटुंब आहे. भूमिहिन आहेत. मातीची भांडी तयार करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. भागरथा व श्रावण पात्रे यांना महादेव, अशोक व रामदास ही तीन मुले. तिघांचेही लग्न झाले. सोबतीला म्हातारी आई भागरथा. आधुनिक युगात कुंभाराची माती कवडीमोल झाली आहे. पूर्वी मातीची भांडी स्वयंपाकात असायची. रेफ्रीजरेटरने थंड पाण्याचे माठ हिसकावून घेतले. या व्यवसायाला अखेरची घरघर लागल्याने इतरांच्या कामावर जाऊन मोलमजुरी करणे या कुटुंबाच्या वाट्याला आले. या तीन भावंडांना चार मुले व तीन मुली अशी एकूण सात अपत्य. एकंदर १४ लोकांचा हा कुटुंब.
मजुरीचे काम करीत असताना २००० मध्ये ट्रॅक्टरच्या अपघातात अशोकचा मृत्यू झाला. २०१० मध्ये रामदास व २०१४ मध्ये महादेवचा मृत्यू झाला. या कुटुंबातील तिन्ही महिला विधवा झाल्या. या कुटुंबाचा संपूर्ण भार म्हातारी भागरथा व तिन्ही सुनांवर आला. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. या तिन्ही महिलांनी हे आवाहन स्विकारले. लहान लहान मुलांच्या संगोपनाची एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली. उद्भवलेल्या परिस्थितीने न डगमगता त्यांनी मोलमजूरी करणे सुरू केले.
काबाडकष्ट करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सध्या सुरू आहे. मात्र अद्यापही या कुटुंबासमोर मुलांचे शिक्षण, त्यांची कार्य, या तीन विधवा महिलांना पार पाडावी लागणार आहेत. हे कुटुंब सध्या एका तुटक्या फुटक्या घरकुलात वास्तव्यास आहेत. जुनाट घर आहे. आर्थिक विवंचनेमुळे त्याची डागडुजी कराणे शक्य नाही. नवीन घर तयार करणे तर अत्यंत कठीण बाब आहे. ऐवढे मोठे कुटुंब मोडकळीस आलेल्या घरात कसे राहील हा खरा प्रश्न आहे. प्रधानमंत्र्यांनी आवास योजनेची घोषणा केली मात्र अशा योजनांचा लाभ धनदाडग्यांना आधी होतो. नंतर योजना गोरगरीबांच्या झोपडीपर्यंत येवून पोहोचतात. विशेष उल्लेखनिय म्हणजे या कुटुंबियाच्या घरात आजपर्यंत वीज पोहचलीच नाही.
परिस्थितीमुळे हतबल झालेल्या या कुटुंबात सर्वजण अल्पशिक्षितच राहिले आहेत. कुटुंबाचा गाडा चालवायचा की शिक्षण घ्यायचे हा गंभीर प्रश्न आहे. ज्या घरात शिक्षणच पोहोचले नाही ती वंशज सुद्धा आजघडीला मोलमजुरीच करतात. हे सारे काही असले तरी त्या तीन विधवा महिला खंबीरपणे जो संघर्ष करीत आहेत तो निश्चितच प्रसंशनीय आहे.
अशा या कुटुंबाला सलाम ! शासन व प्रशासन अशा कुटुंबावर मायेची झालर पांघरेल का ! हा खरा प्रश्न या महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू
जन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तू
नको रडू... ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ं म्हणत तू
शोध घे स्वत:चा, एक नवीन कहाणी लिही तू
घर आणि करिअर, तारेवरची कसरत करतेस तू
एकविसाव्या शतकातली सुपरवुमन तू
रक्षण, आरक्षण हे आक्रोश सोड तू
कर्म करत रहा, फळाला पात्र होशील तू
भगिणी भाव जरुर पाळ तू
कणखर हो, स्वत:ची मदत स्वत: हो तू
विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू
उठ चल, यशाच्या शिखरांची तुला साद... ऐ क तू
‘स्त्री’ म्हणून जन्मलीस ‘ व्यक्ती’ म्हणून जग तू