अबब... बर्थ डे गिफ्टसाठी शिक्षिकेला तब्बल १२:३५ लाखांनी फसविले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 03:33 PM2023-09-08T15:33:05+5:302023-09-08T15:39:03+5:30
गिफ्ट मिळाले नाही, चाैघांवर गुन्हा दाखल : फेसबुकच्या मैत्रीतून शिक्षिकेची फसवणूक
गोंदिया : आपण सोशल मीडियाचा वापर करीत असाल तर सावध व्हा, आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे लुटणारी टोळी आज समाजात सक्रिय आहे. सहसा बर्थडे आपला असला की आपल्याला गिफ्ट मिळते. परंतु धनाढ्य व्यक्ती आपल्या बर्थडेला दुसऱ्यांना गिफ्ट देतात. असा फेसबुकवर मैत्री करणारा ब्राझील येथील मूळचा व अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका मित्राने शिक्षिकेला महागडे गिफ्ट पाठविण्याचे सोंग केले. त्याच्या या नाटकात इतर तिघांचा समावेश होता. ते गिफ्ट दिल्लीला आले, आता आपल्या घरापर्यंत येण्यासाठी त्याचे चार्ज पे करावे लागतील, असे सांगत शे-दोनशे नव्हेत तर तब्बल १२ लाख ३५ हजार ६०० रुपये लुटल्याचा प्रकार गोरेगाव येथे घडली.
गोरेगाव तालुक्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचगावटोला येथे कार्यरत शिक्षिका माधुरी भैय्यालाल रहांगडाले (५४) रा. भंगाराम चौक गोरेगाव यांची फसवणूक करण्यात आली आहे.
त्या सोशल मीडियावर फेसबुक चालवितात. जून २०२३ मध्ये फेसबुकवर जॅक्सन जेम्स रा. अमेरिका याने त्यांच्या फेसबुकवरून मैत्री केली. आपण मूळचा ब्राझील येथील असून अमेरिकेत राहात असल्याचे त्याने फेसबुकवर सांगितले. १३ जूनला आपला वाढदिवस आहे त्यासाठी मी आपल्याला एक किमती गिफ्ट पाठवतो. त्यासाठी तुमचा पत्ता सांगा, असे त्याने शिक्षिकेला म्हटले. त्यावर शिक्षिकेने आपला पत्ता त्याला दिला. परंतु गिफ्ट देण्याचे नाटक करून वारंवार त्यांना चौघांनी लुटले. तब्बल १२ लाख ३५ हजार ६०० रुपये त्यांनी ते गिफ्ट स्वीकारण्यासाठी आरोपींच्या अकाऊंटवर टाकले. पैसे देऊनही गिफ्ट न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गोरेगाव पोलिस ठाणे गाठले. त्या आरोपीविरुध्द गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
म्हणे, गिफ्ट दिल्ली एअरपोर्टला पोहोचले
१३ जून २०२३ ला वाढदिवस असल्याने जॅक्शन जेम्स याने गिफ्ट देण्याच्या नावावर त्यांचा गोरेगाव येथील राहण्याचा पत्ता विचारला. १० जून रोजी गिफ्ट पाठविल्याचा त्याने मॅसेज शिक्षिकेला केला. गिफ्टमध्ये दागिने, पैसे, मोबाइल पाठविलेला आहे. १२ जून २०२३ रोजी तुमचे गिफ्ट दिल्ली एअरपोर्टवर पोहोचून जाईल, असे त्याने सांगितले. १२ जून रोजी पार्सल एजंट अदनान मोहिंदर रा. दिल्ली या व्यक्तीने शिक्षिकेला फोन करून तुमचे पार्सल दिल्ली एअरपोर्टवर आले आहे असे सांगितले.
किमती गिफ्टचे मोजावे लागतील १० टक्के म्हणत उकळले पैसे
शिक्षिका माधुरी रहांगडाले यांच्याकडून कस्टम क्लिअरन्स चार्जेसच्या नावावर ७५ हजार रुपये मागितले. त्यानंतर नो-ड्रग्ज सर्टिफिकेट व नो-टेररिस्ट सर्टिफिकेटकरिता ७ लाख ६० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. परंतु त्यांच्याकडे पैसे कमी असल्याचे सांगत शिक्षिकेने ६ लाख ६० हजार रुपये पाठविले. त्यानंतर अदनान मोहिंदर याने पुन्हा व्हॉट्सॲपवर मॅसेज करून तुमच्या पार्सलमध्ये अतिशय महागड्या वस्तू आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या वस्तूंच्या किमतीच्या १० टक्के १५ लाख ४५ हजार रुपये चार्जेस पेड करावे लागतील असे सांगितले. त्यानंतर शिक्षिका रहांगडाले यांनी १४ जून रोजी २ लाख ३० हजार व १५ जून रोजी २ लाख ७० हजार रुपये चेकद्वारे अदनान मोहिंदर याने पाठविलेल्या अकाऊंटवर पाठविले. असे १२ लाख ३५ हजार ६०० रुपये त्यांच्याकडून उकळून त्यांची फसवणूक केली.
या चौघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात जॅक्सन जेम्स रा. युनायटेड किंगडम, अदनान मोहिंदर, अमित यादव, दुलाल मंडल सर्व रा. दिल्ली या चौघांवर ६ सप्टेंबर रोजी गोरेगाव पोलिसात भादंविच्या कलम ४२०, ३४, सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक अजय भुसारी करीत आहेत.