खतांच्या किमतीमध्ये झाली भरमसाठ वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:29 AM2021-05-13T04:29:41+5:302021-05-13T04:29:41+5:30
आमगाव : कोरोनाच्या प्रकोपामुळे व मागील वर्षीच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असतानाच आता खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी खतांचे ...
आमगाव : कोरोनाच्या प्रकोपामुळे व मागील वर्षीच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असतानाच आता खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी खतांचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन खतांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बी-बियाणे, खत, कीटकनाशके यांचा काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मागील लॉकडाऊनमध्ये बोगस बियांणामुळे बहुतांश भागात बियाणांची उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. यावर्षीही खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच कोरोनाकाळात खतांचा काळाबाजार झाल्यास शेतकरी पुरता हवालदिल होईल. त्यामुळे कृषी विभागाने अधिक दक्ष राहून काळाबाजार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. खतांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणेही आवश्यक असल्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यातच ट्रॅक्टर मालकांनी इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांना दुहेरी भुर्दंडाचा भार सोसावा लागणार आहे.
...............
खरिपाचा खर्च वाढणार
खरीप हंगामाच्या तोंडावर झालेली ही दरवाढ शेतकऱ्यांची कंबरडे मोडणारी आहे. डीएपी ह्या खताच्या ५० किलोच्या बॅगला पूर्वी १३००रुपये मोजावे लागत होते आता १९०० रुपये मोजावे लागणार आहेत. १०:२६:२० ह्या खताची किंमत ११७४ रुपयांवरून वाढून १७७५ रुपये झाली आहे. १२५० रुपयांना मिळणारे १२:३२:१६ हे खत आता शेतकऱ्यांना १८०० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे खरिपाच्या लागवड खर्चात यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.