खताच्या किमती आकाशाला; पण शेतमालाचे भाव जमिनीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:27 AM2021-05-16T04:27:48+5:302021-05-16T04:27:48+5:30
गोंदिया : यंदा खताच्या किमतीमध्ये चारपट वाढ झाल्याने खरीप हंगामाच्या लागवड खर्चात वाढ झाली असून, शेती करायची कशी, असा ...
गोंदिया : यंदा खताच्या किमतीमध्ये चारपट वाढ झाल्याने खरीप हंगामाच्या लागवड खर्चात वाढ झाली असून, शेती करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला. कोरोनामुळे मागील वर्षीपासून शेतकरी आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्यातच आता खताच्या किमती आकाशाला भिडल्या असून, शेतमालाच्या किमती मात्र स्थिर असल्याने खर्चाचा ताळमेळ बसवायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
सर्वच खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीमध्ये यंदा भरमसाट वाढ केली आहे. मागील वर्षी ११८५ रुपयांना मिळणाऱ्या डीएपी खताच्या एका बॅगसाठी यंदा शेतकऱ्यांना १९०० रुपये मोजावे लागत आहे, तर हीच स्थिती अन्य खतांची आहे. खत कंपन्यांनी कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याचे कारण पुढे करीत खताच्या किमतीमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे यंदा खरीप हंगामाचे बजेट पूर्णपणे बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक एकर धानाच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना पूर्वी १५ ते १८ हजार रुपये खर्च येत होता. मात्र, यंदा खताच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्याने २५ हजार रुपयांपर्यंत खर्च जाण्याची शक्यता आहे. एकरी १७ ते १८ क्विंटल धानाचे उत्पादन होत असून, लागवड खर्च जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक न राहण्याची शक्यता आहे. खते, बियाणे आणि इतर खर्चात दरवर्षी वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढत नसल्याने शेतकरी डबघाईस आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेती करणे ताेट्याचे होत चालले आहे.
.....