मंगळवारपासून आमरण उपोषण
By admin | Published: February 15, 2016 01:53 AM2016-02-15T01:53:23+5:302016-02-15T01:53:23+5:30
नवेगावबांध येथील मुस्लीम समाजाला मुर्दे गाडण्यासाठी मुकर्रर असलेल्या जागेवर एका महिलेने झोपडी बांधून अतिक्रमण केले.
इशारा : मुस्लीम कब्रस्तान कमिटी नवेगावबांध
अर्जुनी मोरगाव : नवेगावबांध येथील मुस्लीम समाजाला मुर्दे गाडण्यासाठी मुकर्रर असलेल्या जागेवर एका महिलेने झोपडी बांधून अतिक्रमण केले. ते तातडीने हटविण्यात यावे यासाठी मुस्लीम कब्रस्तान कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून (दि.१६) बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवेगावबांध येथील गट क्र. ११०७ मधील १.२७ हे.आर. जागा ही अनेक वर्षांपासून मुस्लीम समाजाला मुर्दे गाडण्याकरिता मुकर्रर आहे. १५ आॅगस्ट २०१४ रोजी कुंपन व जळाऊ काड्या ठेवून एका महिलेने येथे अतिक्रमण केले. ही जागा भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करण्यात आली. एवढेच नव्हे तर ११ जानेवारी रोजी झोपडी सुद्धा बांधली. तक्रार करताच चौकशी झाली मात्र अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. यासंदर्भात अनेकदा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आल्या. मात्र सातत्याने कानाडोळा केला जात आहे.
या वादग्रस्त जागेच्या संबंधाने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी २६ मे २०१५ रोजी एक आदेश पारित केला. प्रकरणात शासकीय जागेवर अतिक्रमण असल्यास फौजदारी प्रक्रिया संविधा १९७३ कलम १४५ प्रमाणे ताबा अंतिम करण्यात येत नाही. तहसीलदारांनी १५ दिवसात या शासकीय जागेवर योग्य निर्णय घेवून आदेश पारित करावे, असा निर्णय दिला. मात्र अद्यापही तहसीलदारांनी यावर कुठलाच निर्णय दिला नाही. या जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवून सातबाराचा उतारा मुस्लीम कब्रस्तानच्या नावाने नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)