सालेकसा तालुक्यात गावागावात तापाचे थैमान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:34+5:302021-05-15T04:27:34+5:30
सालेकसा : सध्या सर्वत्र कोविडने थैमान घातले असून कोरोनाने शहरातून ग्रामीण भागात आपला मोर्चा वळविला आहे. साथरोगाचा थैमान नंतर ...
सालेकसा : सध्या सर्वत्र कोविडने थैमान घातले असून कोरोनाने शहरातून ग्रामीण भागात आपला मोर्चा वळविला आहे. साथरोगाचा थैमान नंतर कोविडचे संक्रमण अशी भयावह परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. प्रत्येक गावात तापाची साथ सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोक हादरलेले दिसत आहेत. दरम्यान साथरोग नियंत्रणात आणण्यात आरोग्य विभाग ही हतबल झाला आहे.
१५ दिवसांपूर्वी तालुक्यातील पानगाव, सोनपुरी, ब्राम्हण टोला, गोवारी टोला या गावांमध्ये एकाच वेळी अनेकांना ताप येण्याची साथ सुरु झाली. स्थानिक डॉक्टरांनी तेव्हा टायफाईडची साथ असल्याचे सांगत औषधोपचार करण्यास सुरुवात केली. परंतु जेव्हा आरोग्य विभागाने कोविड चाचणी केली. तेव्हा तीस ते चाळीस टक्के रुग्ण कोविड लागण झालेले आढळत आहेत. काही गावांमध्ये संपूर्ण गावात तापाची लागण झाली आहे. तर एका गावातून दुसऱ्या गावात संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या तालुक्यातील सालेकसा, आमगाव खुर्द, ब्राम्हण टोला, सोनपुरी, पानगाव, पांढरी, कोटजंभुरा, बिंझली, रोंढा, गोवारी टोला, पिपरीया, दरेकसा, जमाकुडो, पठाण टोला , खेडेपार, चांदसूरज, बाम्हणी, बिजेपार, नानव्हा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ताप आलेले रुग्ण आढळत आहेत. एवढेच नव्हे तर एकमेकांच्या संपर्कात वावरत असल्याने तापाचे संक्रमण सुद्धा त्यापेक्षा किती तरी पटीने वाढत आहे.
बॉक्स....
आरोग्य विभाग हतबल
दिवसेंदिवस वाढत चाललेले तापाचे थैमान त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात सतत रुग्णांची हजेरी त्यामुळे आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात टाकून दिवसरात्र औषधोपचार करीत आहेत. प्रत्येकाला ताबडतोब सेवा मिळत नसल्याने अनेक लोक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर आपला रोष काढताना दिसत आहेत. आरोग्य केंद्रावरील गर्दी कमी व्हावी म्हणून काही गावांमध्ये आरोग्य शिबिर लावून आरोग्य तपासणी करुन औषधाेपचार करीत आहेत.
बॉक्स....
संपूर्ण गावात आजाराचे संक्रमण झालेले तालुक्यातील पानगाव आणि ब्राम्हण टोला या गावामुळे प्रवेश बंदी करण्यात आली असून बाहेरच कोणीही व्यक्ती या गावात प्रवेश करु शकत नाही. पानगावात सोनपुरीकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. गावातील लोकांना येणे जाणे कठीण झाले आहे. दरम्यान गावांमध्ये अनेक कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका लोकांना जनजागृती करीत सतर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत.