बालरोगतज्ज्ञांची मोजकीच पदे, कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:29+5:302021-05-28T04:22:29+5:30
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरला लागत असल्याचे दिलासादायक चित्र असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. तिसऱ्या ...
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरला लागत असल्याचे दिलासादायक चित्र असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. तिसऱ्या लाटेत सर्वाधिक बालके बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाने तयार सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेत बालरोगतज्ज्ञांची गरज भासणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात किती बालरोगतज्ज्ञ आहेत, याचा आढावा घेतला असता मोजकीच पदे असल्याची बाब पुढे आली. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील आरोग्याची धुरा ही प्राथमिक केंद्रावर असते. मात्र, जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांत एकही बालरोग तज्ज्ञ नाही. तर देवरी, अर्जुनी मोरगाव या दोन ग्रामीण रुग्णालयांत आणि तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १ बालरोग तज्ज्ञ कार्यरत आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ८ आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात ३ बालरोगतज्ज्ञ कार्यरत आहेत. मात्र, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता कार्यरत बालरोगतज्ज्ञांची पदे मोजकीच असल्याने कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञांची पदे तात्पुरत्या स्वरूपात तरी भरण्याची गरज आहे.
..............
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र : ४०
बालरोगतज्ज्ञ : ०
उपजिल्हा रुग्णालय : १
बालरोगतज्ज्ञ : १
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय :
बालरोगतज्ज्ञ : ८
............................
जिल्ह्यातील एकूण रुग्ण :
बरे झालेले रुग्ण :
उपचार घेत असलेले रुग्ण :
१० वर्षांपेक्षा कमी वयाचे रुग्ण : ०
११ ते १८ वर्षे वयोगटातील रुग्ण : ४५
....................
ग्रामीण भागातील स्थिती बिकट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ झाली होती. मात्र, नियोजन नसल्याने रुग्णांची ऑक्सिजन आणि बेडसाठी गैरसोय झाली होती. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बालरोग तज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील स्थिती बिकट असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखणार तरी कशी, असा प्रश्न कायम आहे.
.................
बालकांसाठी १०० खाटांचे कक्ष
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाने तयारी केली आहे. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ६० खाटा आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात ४० खाटा असे एकूण १०० खाटांचे विशेष कक्ष बालकांसाठी तयार करण्यात आले आहेत. तसेच यासाठी बालरोगतज्ज्ञांचा विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आला असून शहरातील २० खासगी बालरोगतज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
.................
टास्क फोर्सच्या बैठका सुरू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोगतज्ज्ञ आणि शहरातील खासगी रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ यांचे एक विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. या टास्क फोर्सच्या नियमित बैठका सुरू असून त्यात तिसरी लाट आल्यास तिचा कसा सामना करायचा, या अनुषंगाने चर्चा करून नियोजन केले जात आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले जात असून जनजागृतीवर भर दिला आहे.
..........
कोट
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच अनुषंगाने आरोग्य विभागाने नियोजन सुरू केले आहे. १०० खाटांचे विशेष कक्ष आणि टास्क फोर्ससुद्धा गठित करण्यात आला आहे.
- डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक
....................