पाईपलाईनच्या खोदकामासाठी शेतातील पिके केली भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 09:37 PM2022-03-04T21:37:25+5:302022-03-04T21:38:52+5:30
धापेवाडा उपसा सिंचन टप्पा २ चे पाणी बोदलकसा तलावामध्ये टाकण्यासाठी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ १० टक्के काम अपूर्ण असून, फक्त सुकडी डाकराम ते पिंडकेपार सोनझारीटोली दीड कि.मी.चे काम शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी शेतातून पाईप लाईन न टाकता रस्त्याने पाईप टाकण्याची मागणी केली होती. तसेच याला विरोध केला होता. पण संबंधित विभागाने पोलीस बंदोबस्तात शेतामधून पाईप लाईन टाकली. परिणामी शेतामध्ये मोवरीच्या उभ्या पिकातून खोदकाम सुरु केले. परिणामी मोवरीचे पीक पूर्णपणे नष्ट झाले.
हितेंद्र जांभुळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी/डाकराम : धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ च्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुकडी डाकराम येथील शेतकऱ्यांच्या शेतातून केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. पण, याकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
धापेवाडा उपसा सिंचन टप्पा २ चे पाणी बोदलकसा तलावामध्ये टाकण्यासाठी ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ १० टक्के काम अपूर्ण असून, फक्त सुकडी डाकराम ते पिंडकेपार सोनझारीटोली दीड कि.मी.चे काम शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी शेतातून पाईप लाईन न टाकता रस्त्याने पाईप टाकण्याची मागणी केली होती. तसेच याला विरोध केला होता. पण संबंधित विभागाने पोलीस बंदोबस्तात शेतामधून पाईप लाईन टाकली. परिणामी शेतामध्ये मोवरीच्या उभ्या पिकातून खोदकाम सुरु केले. परिणामी मोवरीचे पीक पूर्णपणे नष्ट झाले.
धापेवाडा उपसा सिंचन विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्या उभ्या पिकांचीसुद्धा त्यांना गय केली नाही. आधीच नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना सिंचन विभागाच्या भूमिकेमुळे कृत्रिम संकटांना तोंड द्यावे लागत आहे. धापेवाडा उपसा सिंचन विभाग तिरोडाचे कार्यकारी अभियंता ए. पी. कापसे यांच्याशी संपर्क उभ्या मोवरी पिकातून खोदकाम केले. त्या पिकांचे नुकसानभरपाई किती देणार यावर कापसे यांनी ही माहिती तुम्हाला माहिती देण्याची गरज नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली.
नुकसानभरपाई मिळणार की नाही?
- गट क्र. ३६६, १.६२ हे.आर. मध्ये मोवरी पिकाची लागवड केली होती. त्यामध्ये चार एकरांपैकी ३ एकर शेतातील मोवरी पीक पूर्णपणे नष्ट केले. पीक नष्ट झाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांना नुकसानभरपाईसुद्धा मिळणार नाही. संबंधित विभागाचे अधिकारीसुद्धा योग्य उत्तर देत नसल्याने नुकसानभरपाई मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माझी चार एकर शेती असून, मोवरी पिकापैकी तीन एकर मोवरी पीक पूर्णपणे भुईसपाट झाले. त्यांचे नुकसानभरपाईसाठी अधिकारी, कर्मचारी कोणीच सांगायला व बोलायला तयार नाही. आम्हा शेतकऱ्यांचा कोणीच वाली नाही.
- ईश्वर लांजेवार, सुकडी डाकराम