कोरोना बाधितांची पंधरा हजारी वाटचाल सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:30 AM2021-03-17T04:30:13+5:302021-03-17T04:30:13+5:30
गोंदिया : मागील तीन-चार महिने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. त्यानंतर आता मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा ...
गोंदिया : मागील तीन-चार महिने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. त्यानंतर आता मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४,८०५ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने कोरोना बाधितांची पंधरा हजारी वाटचाल सुरू झाली असून जिल्हावासीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
जिल्ह्यात मंगळवारी (दि. १६) ५० नवीन रुग्णांची नोंद झाली तर १६ बाधितांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी आढळलेल्या ५० कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ३० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. आमगाव ३, देवरी ७, सडक अर्जुनी २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ८ रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया तालुक्यासह आता इतरही तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हावासीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा केव्हाही आणखी उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लगतच्या जिल्ह्यांमध्येसुध्दा कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने आता कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ८५,७३० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७२,६९६ नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ७६,४५२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७०,१५० नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४,८०५ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १४,३४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २७८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १०३३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
............
राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा रिकव्हरी दर अधिक
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी बाधित रुग्ण बरे होण्याचा दर अधिक आहे. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर ९६.८५ टक्के असून राज्याचा रिकव्हरी दर ९६.०२ टक्के आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही थोडी दिलासादायक बाब आहे.
.......
नागरिकांनो, स्वत:ची आणि कुटुंबीयांची घ्या काळजी
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून नागरिकांचे याकडे होत असलेले दुर्लक्ष हेसुध्दा या मागील एक कारण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिक मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. तसेच स्वत:ची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी.