पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अखेर पुढे ढकलली...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:30 AM2021-05-11T04:30:37+5:302021-05-11T04:30:37+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली होती.
मात्र, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ही पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून केली जात होती. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे सोमवारी घेण्यात आला.
राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात ,घेता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून, परीक्षेची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल, असे आयुक्त तुकाराम सुपे यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. या वर्षी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ८८ हजार तर आठवीसाठी २ लाख ४४ हजार म्हणजे राज्यातून एकूण ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थी, पालकांची परीक्षा केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता, परीक्षा पुढे ढकलल्याच्या निर्णयाचे विद्यार्थी, पालकांनी स्वागत केले आहे.