पाचव्या दिवशी सुरू झाली प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:00 AM2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:28+5:30
डॉक्टरांच्या अभावामुळे मागील चार दिवसांपासून गंगाबाई स्त्री रूग्णालयात प्रसूती बंद होत्या. यावर ‘लोकमत’ने कडाडून टिका केली होती. याची दखल घेत सोमवारी (दि.३) पालकमंत्री डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे व आमदार विनोद अग्रवाल यांनी गंगाबाईतील डॉक्टरांचा तिढा सोडविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय हे गर्भवतींसाठी वरदान ठरण्यापेक्षा आता अभिशाप ठरण्याच्या मार्गावर होते. १ नोव्हेंबर पासून येथे गर्भवती महिलांची प्रसूती करण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे चार दिवसांपासून प्रसूती बंद होती. परंतु आमदार, खासदार व पालकमंत्री यांनी डॉक्टरांच्या कानपिचक्या घेतल्यानंतर पाचव्या दिवशी मंगळवारपासून (दि.५) प्रसूतीसाठी रूग्ण दाखल करुन प्रसूती सुरू करण्यात आली.
डॉक्टरांच्या अभावामुळे मागील चार दिवसांपासून गंगाबाई स्त्री रूग्णालयात प्रसूती बंद होत्या. यावर ‘लोकमत’ने कडाडून टिका केली होती. याची दखल घेत सोमवारी (दि.३) पालकमंत्री डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे व आमदार विनोद अग्रवाल यांनी गंगाबाईतील डॉक्टरांचा तिढा सोडविला.
गंगाबाईतील विदारकतेचे जिवंत चित्रण समाजासमोर मांडल्याने खळबळून जागे झालेले लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी फक्त गंगाबाईवरच बोलू लागले. वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. पी.व्ही. रूखमोडेसह गंगाबाईत सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टरांना समस्या कशा सोडविता येईल यावर बोलून तेथील समस्या निवारणासाठी प्रथमच प्राधान्य देण्यात आले.
पालकमंत्री डॉ. फुके, खासदार मेंढे, आमदार अग्रवाल व जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत समस्यांवर कसा तोडगा काढता येईल यावर चर्चा केली.
गंगाबाईतील समस्या निवारणासाठी जिल्हा नियोजन निधीतून तीन कोटी रूपये देण्याची तयारी पालकमंत्री डॉ. फुके यांनी दर्शविली. पालकमंत्र्यांनी फटकारल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रु खमोडे यांनी सोमवारी (दि.४) प्रसूती सेवा बहाल करण्यासाठी सहा डॉक्टरांची पर्यायी व्यवस्था म्हणून डॉ. सायास केंद्रे, डॉ. आशा अग्रवाल, डॉ. शीतल खंडेलवाल, डॉ. राजश्री पाटील, डॉ. गरिमा अरोरा, व डॉ. सविता वडेरा यांना पाठविले. हे सर्व डॉक्टर आठ-आठ तासांची नोकरी करणार असे सांगण्यात आले. त्यानुसार, मंगळवारी (दि.५) प्रसूती सुरू करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी आता सुटकेचा श्वास घेतला. एकट्या गंगबाईवर जिल्ह्यातील गरीब जनता अवलंबून आहे, हे विशेष.
मेडीकल फक्त नावाचेच
गोंदियाचे वैद्यकीय महाविद्यालय फक्त नावासाठी आहे. मेडीकल कॉलेजमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा सोडा केटीएस रूग्णालयाच्या काळात मिळणाऱ्या साधारण सेवाही आता मिळत नाही. मेडीकल कॉलेजची परवानगी एमसीआयकडून टिकून राहावी यासाठी चमू येते. त्यावेळी बाहेरचे डॉक्टर बोलावून संख्याबळ दाखविले जाते. त्यानंतर मात्र चमू गेली की स्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते.