देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 09:32 PM2018-08-12T21:32:36+5:302018-08-12T21:33:17+5:30
दिल्ली येथील जंतर-मंथर येथे भारतीय जनतेच्या अस्मितेचे प्रतिक भारतीय संविधानाची होळी करण्यात आली. जातीप्रथेचे समर्थन करून भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिल्ली येथील जंतर-मंथर येथे भारतीय जनतेच्या अस्मितेचे प्रतिक भारतीय संविधानाची होळी करण्यात आली. जातीप्रथेचे समर्थन करून भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. अशा कुप्रवृत्तीचा तिरोडा येथे जाहीर निषेध करण्यात आला. संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी (दि.११) दुपारी तिरोडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. तसेच पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, विविध जातीधर्माच्या लोकांचा समावेश असलेल्या भारत देशाला भारतीय संविधानाने एका धाग्यात गुंफले आहे. विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय संविधानाला राष्टÑग्रंथाची उपमा दिली आहे. देशाचे महापुरूष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार भारत देशाचे सर्व कामकाज चालते. जगात भारतीय राज्य घटनेचा गौरवाने उल्लेख केला जातो, ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे.
असे असताना मनुवादी मानसिकतेच्या दिल्ली येथील जागतिक आरक्षणविरोधी मंच या संघटनेचे प्रमुख श्रीनिवास पांडये व त्यांच्या विकृत कार्यकर्त्यांनी ९ आॅगस्ट २०१८ रोजी जंतर-मंतर दिल्ली येथे पोलीस यंत्रणेसमक्ष भारतीय संविधानाची जाहीररित्या होळी केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या घटनेचे फेसबुक चित्रण श्रीनिवास पांडये यांनी केले असून त्याची संबंधित लिंक दिली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. भारताचे संविधान व भारताचा राष्टÑध्वज असलेल्या तिरंग्याला भारतातील जनतेच्या मनात असीम आदर व स्वाभिमान आहे. देशाचे शूर सैनिक तिरंग्यासाठी प्राणाची आहुती देतात. असे असताना श्रीनिवास पांडये नावाच्या विकृताने आपल्या बुरसट विचारसरणीच्या लोकांना सोबत घेवून जंतर-मंतरसारख्या सार्वजनिक ठिकाणी पोलीस यंत्रणेसमक्ष भारतीय संविधानाची होळी करण्याचे अत्यंत देशद्रोही कृत्य केले.
भारताच्या इतिहासात पहिलीच अशी ही विकृत देशद्रोही कृती आहे. भारतीय संविधानाला आव्हान देणाºया, भारतीय संविधानाला जाळणाºया व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा देवून अपमान करणाºया समाज कंटकाविरोधात ‘प्रिव्हेंशन आॅफ इन्सल्ट आॅफ नॅशनल आॅनर अॅक्ट, १९७१ अॅण्ड १२४ ए आॅफ प्रिव्हेंशन आॅफ एससी एसटी अॅट्रोसिटी अॅक्ट’ तसेच सदर व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याबद्दल आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक करावी. तसेच या घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
सदर निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व उपविभागीप अधिकारी तिरोडा यांना देण्यात आल्या आहेत. पोलीस ठाण्यात निवेदनाचे वाचन सामाजिक कार्यकर्ते अतुल गजभिये यांनी केले. निवेदन देतेवेळी माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी आमदार भजनदास वैद्य, कृष्णा रामटेके, सुरेश बन्सोड, पृथ्वीराज मेश्राम, बबलदास रामटेके, प्रदीप मेश्राम, महेंद्र सूर्यवंशी, मनोहर गजभिये, महेंद्र बडगे, व्ही.डी. मेश्राम, मोरेश्वर डहाटे, वंदना चव्हाण, आर.व्ही. तिरपुडे, एन.पी. शहारे, वसीम शेख, आशय वैद्य, प्रदीप पापणकर, जितेंद्र डहाटे, नगरसेवक विजय बन्सोड, राजकुमार वासनिक, विनोद चव्हाण, उमेश मेश्राम, संजय श्यामकुवर, व्ही.पी. उके, निलेश मेश्राम, रोशन बडगे, उमेश मेश्राम, राजेश गुणेरिया, वैशाली तिरपुडे, विरेंद्र बावणे, प्रशांत डहाटे, चंद्रकुमार भिमटे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
१६ आॅगस्ट रोजी मोर्चा
भारतीय संविधान जाळणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, यासाठी तिरोडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातून गुरूवारी (दि.१६) मोर्चा काढण्यात येईल. हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार असून तेथे निवेदन देण्यात येणार आहे. यात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.