विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या मंडळावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:45+5:302021-09-21T04:31:45+5:30
गोंदिया : गणरायाचे विसर्जन साध्या पद्धतीने करण्याचे शासनाचे आदेश असतानाही विसर्जन ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्ता तसेच ...
गोंदिया : गणरायाचे विसर्जन साध्या पद्धतीने करण्याचे शासनाचे आदेश असतानाही विसर्जन ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्ता तसेच धुमाळ पार्टी व वाहनचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल आहे. तिरोडा पोलिसांनी रविवारी (दि.१९) ग्राम मुंडीटोरा येथे सायंकाळी ५.४५ वाजतादरम्यान ही कारवाई केली आहे.
महाराष्ट्र शासन गृहविभाग मंत्रालयाच्या परिपत्रक नुसार कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी गणेशेत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार ‘श्रीं’च्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असे सप्ष्ट नमूद करण्यात आले आहे. याबाबत सर्व गणपती मंडळांना परवानगी देताना आणि गणपती मंडळांच्या बैठकीतही सुस्पष्ट माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंडीकोटा येथील सरपंचांना ‘ना हरकत प्रमाणपत्रा’तसुद्धा वरील शासनपरिपत्रकानुसार विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये, असे नमूद केलेले आहे.
त्यानंतरही ग्राम मुंडीकोटा येथील नवयुवक गणेश मंडळाने रविवारी (दि.१९) सायंकाळी ५.४५ वाजतादरम्यान मा सरस्वती दिलवर ग्रुप डीजे धुमाळ यांचे साऊंड सिस्टीम मोठ्या गाडीवर लावून गणपतीचे गाणे वाजवत व मध्ये बँड वाजवून मोहल्ल्यातील पुरुष-महिला नाचत गुलाल एकमेकांना लावत मिरवणूक काढली. शासन परिपत्रकाचे उल्लंघन केल्यामुळे गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रमोद काळसर्पे, उपाध्यक्ष सोमेश राऊत, सचिव शीवकुमार राऊत, कोषाध्यक्ष बुद्धघोष बोम्बार्डे, सदस्य मंगेश राऊत, नीकेश नीलगाये, अक्षय राऊत, मा सरस्वती दिलवर रूप डीजे धुमाल पार्टीचे (पांजरा, तुमसर) मालक व टाटा एस गाडी क्रमांक (एमएच ३६- एए १३२४)च्या मालक-चालकावर पोलीस शिपाई इरफान शेख यांचे तक्रारीवरून भादंवि कलम १८८, २६९ सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, सहकलम ११ महाराष्ट्र कोविड अधिनियम २०२० सहकलम २,३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शंकर साठवणे करत आहेत.