कोरोनाबाधित रुग्णांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:30 AM2021-04-04T04:30:20+5:302021-04-04T04:30:20+5:30
अर्जुनी-मोरगाव : गृहविलगीकरणात असलेला कोरोनाबाधित रुग्ण होमक्वारंटाईनच्या नियमांचे पालन न करता घराबाहेर फिरत असल्याचे आढळला. याप्रकरणी अर्जुनी मोरगावनगर पंचायतीच्या ...
अर्जुनी-मोरगाव : गृहविलगीकरणात असलेला कोरोनाबाधित रुग्ण होमक्वारंटाईनच्या नियमांचे पालन न करता घराबाहेर फिरत असल्याचे आढळला. याप्रकरणी अर्जुनी मोरगावनगर पंचायतीच्या मुख्याधिकारी यांनी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी कोरोनाबाधित रुग्णावर भांदवीच्या कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.२) करण्यात आली.
तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने याला प्रतिबंध लावण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहे. याच अनुषंगाने नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी शिल्पा राणी जाधव यांनी गृहविलगीकरणात असलेले रुग्ण नियमांचे पालन करतात किंवा नाही, याची पाहणी करण्यासाठी शुक्रवारपासून धडक मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास शिल्पा राणी जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत, डॉ. खोब्रागडे, नगर पंचायत कर्मचारी दीपक राऊत, नयन कुमार शहारे, रमेश कुबरे राकेश शहारे, अनमोल जाधव, पोलीस अंमलदार बेहेरे यांनी शहरातील प्रभाग क्रमांक ९ येथे भेट दिली. यादरम्यान गृहविलगीकरणातील एक रुग्ण घरी नसल्याचे आढळले. याची पथकाने चौकशी केली असता, तो शेतावर गेला असल्याची माहिती मिळाली. हा रुग्ण कोरोनाबाधित असल्याने त्याला आरोग्य अधिकाऱ्यांनी ६ एप्रिलपर्यंत होमक्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याने या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.